सरकारची घोषणा ! लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, महिला दिनी मिळणार दोन महिन्यांचे पैसे
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेली लाडकी बहिण योजना अल्पावधीमध्येच लोकप्रिय झाली. या योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांना दीड हजार रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना महायुतीसाठी ‘गेमचेंजर’ ठरली. प्रचारामध्ये या योजनेचा जोरदार वापर करण्यात आला. दरम्यान, उद्या (दि.08) जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी खास ‘गिफ्ट’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींबाबत महायुती सरकारने घेतलेला निर्णय जाहीर केला आहे. त्या म्हणाल्या की, खात्यात पैसे थेट वितरित करणार आहोत. 2 कोटी 52 लक्ष महिलांना हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. एकही महिना असा नाही की महिलांना लाडक्या बहिण योजनेचा हप्ता मिळाला नाही.
8 मार्चचं उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता देणार आहोत, पुढे त्या म्हणाल्या की, टीका तर या योजनेवर सुरुवातीपासूनच होत आली आहे, टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याचा दृष्टीकोनातून ही योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहोत, महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारामध्ये योजनेचा निधी दरमहिना दीड हजाराहून 2100 रुपये करण्यात येईल अशी घोषणा केली होती. यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या योजनेतून वगळण्यात आलेल्या सुमारे १.१ लाख महिला ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होत्या. ही योजना फक्त १८ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी आहे. नियमांअंतर्गत लाभार्थ्यांना काढून टाकले जात आहे ते जून २०२४ मध्ये योजना सुरू करतानाच बनवण्यात आले होते. येत्या अर्थसंकल्पात किंवा अधिवेशनाच्या काळात 2100 रुपये देऊ, असे कोणतेही वक्तव्य आम्ही केले नव्हते. सरकार एखादी योजना जाहीर करते, तेव्हा जाहीरनामा हा 5 वर्षांचा असतो. या अर्थसंकल्पात 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात एक विभाग म्हणून आम्ही आमचा प्रस्ताव शासनाजवळ ठेवला आहे, असे विधान मंत्री आदिती तटकरे यांनी केल्यामुळे राज्यातील महिलांचा हिरमोड झाला आहे.


