भरधाव टिप्परच्या धडकेत कारचा चुराडा ; एकाचा मृत्यू , ४ जखमी

भरधाव टिप्परच्या धडकेत कारचा चुराडा ; एकाचा मृत्यू , ४ जखमी

नागपूर :  अनियंत्रित झालेल्या भरधाव टिप्परने रस्त्याच्या कडेला उभ्या कारला मागून धडक दिली. त्यानंतर टिप्पर एका पानठेल्यात शिरला.  टिप्परच्या धडकेत कारचा चुराडा झाला. या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला तर चौघे जण जखमी झाले. अपघात रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शहरातील गोरेवाडा परिसरातील पलोटी शाळेसमोर झाला. पोलिसांनी चक्क क्रेनचा वापर करुन चुराडा झालेली कार रस्त्याच्या बाजुला केली. घटनेनंतर आरोपी टिप्परचालक पळून गेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक भरधाव टिप्पर गोरेवाडा पलोटी शाळेसमोरून जात होता. त्या टिप्परचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे टिप्परचालकाचे वाहनावर नियंत्रण सुटले. भरधाव टिप्पर समोर असलेल्या एका कारवर आदळला. त्यानंतर टिप्पर रस्त्याच्या कडेला असलेल्या पानठेल्यात शिरला. या अपघातात कारचा चुराडा झाला. या कारच्या दरवाज्यात फसल्याने कारचालकाचा  जागीच मृत्यू झाला. तर पानठेलाचालक आणि तीन ग्राहक असे एकून चार जण जखमी झाले. पानठेलाचालकाला जबर मार लागला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी तक्रारीवरुन आरोपी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. यावेळी घटनास्थळावर मोठी गर्दी उसळली. त्यामुळे पोलिसांना अपघातग्रस्तांना मदत करण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. शेवटी बघ्यांची पळापळ झाल्यानंतर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात रवाना केले. आरोपी टिप्परचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.