दुचाकीस्वार दाम्पत्यावर वाघाचा हल्ला ; दोघेही थोडक्यात बचावले  

दुचाकीस्वार दाम्पत्यावर वाघाचा हल्ला ; दोघेही थोडक्यात बचावले  

भंडारा : साकोली तालुक्यातील मोहघाटा, सराटी परिसरात वाघाचा मुक्तसंचार असून वाघ हल्ला करीत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. सराटी मार्गावर मागील काही दिवसांपासून वाघाचे दर्शन होत असल्याचे बोलले जात होते. काल रात्री याच मार्गाने दुचाकीने जात असलेल्या दाम्पत्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले.

साकोली तालुक्यातील सराटी येथील स्वप्नील रंगारी आणि त्यांची पत्नी कल्याणी हे रात्री दुचाकीने स्वागवी सराटी येथे जात असताना रस्त्यात अचानक एका वाघाने त्याच्या दुचाकीवर उडी घेतली. मात्र स्वप्नील यांनी न डगमगता दुचाकीचा तोल सावरला आणि वेगाने गाडी पुढे घेतली. त्यामुळे दोघांचा जीव थोडक्यात बचावला. गावात पोहचताच दोघांनी वाघाने हल्ला केल्याची बाब पोलीस पाटील यांना सांगितली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. गावातील नागरिकांना कामानिमित्त दररोज याच मार्गाने सकोलीला जावे लागते. या मार्गावर आता वाघाचा मुक्तसंचार असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करून सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.