Nagpur Rain Update: जिल्ह्यात पाणीच पाणी ; ७ व ८ जुलै रोजी हवामान विभागाचे ऑरेंज अलर्ट

Nagpur Rain Update: जिल्ह्यात पाणीच पाणी ; ७ व ८ जुलै रोजी हवामान विभागाचे ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अनेक भागात हाहाकार माजवला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून नाशिक आणि पालघरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघरमधील सूर्या नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे धामडी धरणाचे सर्व 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्येही गोदावरी नदी वाहत आहे, ज्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. प्रशासनाने पर्यटन स्थळांवर अलर्ट जारी केला आहे आणि लोकांना नद्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर राज्यात पावसासाठी पुढील पाच दिवस महत्त्ताचे सांगितले आहेत.

राज्यात बऱ्याच ठिकाण जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह अत्यंत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, कोल्हापूर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या भागातही यलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यासाठी मुसळधार पाऊस, वादळीवारा मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट करीता अलर्ट

भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये ०७ जुलै ते ०९ जुलै २०२५ या कालावधी मध्ये मुसळधार ते  अति मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. दिनांक ०७ व ०८ जुलै २०२५ या कालावधी करिता Orange Alert दिलेला असुन ऑरेंज अलर्ट कालावधीमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून  करण्यात आले आहे.

  • नागरिकांनी घ्यावयाची काळजी

विज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. विज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व विज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे  राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. नागरीकांनी जल पर्यटन स्थळी अती उत्साही होवून जीव धोक्यात घालणारी कुठलीही कृती करू नये. शक्यातोर पाण्यामध्ये उतरण्याचे धाडस करू नये. आपण कितीही चांगले जलतरणपट्टु असले तरी देखील अशा ठिकाणी पोहण्याचे टाळावे. नदी, नाले, दुथळी वाहत असतात तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते अशा वेळी चुकूनही तो पुल किंवा रस्ता चालत किंवा गाडी मधुन ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. आवश्यक खबरदारी घेवून स्वतःची त्याच प्रमाणे आपल्या कुटूंबियांची व मित्र परिवाराची अशा ठिकाणी आवश्यक काळजी घ्यावी व प्रशासणकडून निर्गमित होत असलेल्या सुचणांचे पालन करून सहकार्य करावे .