तालुक्यात कपाशीवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव ; वेळीच ओळखा आणि व्यवस्थापनाचे उपाय अवलंबवा
कुही :- मागील १०-१५ दिवसांपासून असलेल्या सततचा पाऊस, ढगाळ हवामान, वातावरणातील वाढलेली आर्द्रता, सूर्यप्रकाशाचा अभाव, इ. मुळे सध्या रोपावस्था ते शाकीयवाढी दरम्यान ( पेरणीपासून ४० दिवसांपर्यंत) असलेल्या कपाशी पिकात तुडतुडे या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
रस शोषक तुडतुडे ही कीड पोपटी रंगाची व त्रिकोणी आकाराची असून पंखांच्या मागील बाजूस गर्द काळे दोन ठिपके दिसतात. ही कीड तिरकस चालते (इंग्रजी झेड आकारासारखी). पिल्ले आणि प्रौढ दोन्हीही कोवळ्या पानाच्या खालच्या बाजूला राहून रस शोषण करतात, ज्यामुळे पाने खालच्या बाजूला वळलेले (वाकडे झालेले) दिसतात. पानांच्या कडा सुरुवातीला पिवळसर बनतात. कालांतराने पिवळ्या रंगाचे लाल/तांबूस तपकिरी रंगात रूपांतर होऊन पीक लालसर झालेले दिसते. पिकाच्या वाढीच्या प्रारंभिक अवस्थेत आलेला लालसर पणा हा अनेकदा शेतकऱ्यांना लाल्या रोगाबाबत संभ्रमित करतो. परंतु मॅग्नेशियम अथवा नत्र या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकाच्या बोंड लागण ते बोंड विकास अवस्थेत (साधारणतः ९० दिवसांपासून पुढे) येणारा लाल्या आणि तुडतुडे प्रादुर्भावामुळे सुरुवातीच्या काळात (६० दिवसांपेक्षा कमी) आलेला लालसरपणा यातील फरक ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. अचूक निदान झाल्यास योग्य उपाययोजना करून वेळीच समस्येचे निराकरण करणे शक्य होते. त्यामुळे सध्या आपल्या कपाशी पिकात तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव असेल आणि वर दिल्याप्रमाणे लक्षणे दिसत असतील तर तुडतुडे नियंत्रणासाठी खालील उपाय करावेत.
१. पीक लागवड ते ३०-३५ दिवसांपर्यंत कोणतीही रासायनिक कीटकनाशक औषधे फवारू नयेत. कारण बीटी कपाशीच्या बियाण्याला अगोदरच कंपनीकडून इमिडाक्लोप्रिड अथवा थायोमिथोक्झाम पैकी एकाची बीज प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे पिकास ३०-३५ दिवसांपर्यंत सर्व रसशोषक कीडींपासून (मावा , तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी) संरक्षण मिळते.
- ४० ते ४५ दिवसांच्या कपाशी पिकात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क ५% किंवा नीम तेल ५ मिली प्रति लीटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- आर्थिक नुकसान पातळीच्या वर प्रादुर्भाव (२ किंवा त्यापेक्षा अधिक तुडतुडे प्रति पान )असेल तर ४५-६० दिवसांदरम्यान फ्लोनिकामीड ५० डब्ल्यू जी ०.४ ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारणी करावी
- अति प्रादुर्भावामुळे पानांना लालसरपणा आलेला असल्यास ती हिरवी होऊन पिकाची वाढ पुर्ववत होण्यासाठी १ टक्के युरिया (१० ग्रॅम प्रति लीटर पाणी) अथवा २ टक्के डीएपी(२० ग्रॅम प्रति लीटर पाणी) अथवा १ टक्के मॅग्नेशियम सल्फेट (१० ग्रॅम प्रति लीटर पाणी) याप्रमाणे फवारणी करावी.
- इमिडाक्लोप्रिड आणि थायोमिथोक्झाम यांची फवारणी ९० दिवसांपर्यंत करू नये, कारण सुरुवातीला याच कीटनाशकांची बीज प्रक्रिया केलेली असल्याने पुन्हा वापर केल्यास कीडींमध्ये प्रतिकारक क्षमता वाढीस लागून परिणामकारक नियंत्रण मिळत नाही.
-डॉ बाबासाहेब फंड , वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषि कीटकशास्त्र), केंद्रीय कापूस संशोधन, संस्था नागपूर