आंभोरा पर्यटकांना खुणावतोय , दररोज हजारोंच्या संख्येत पर्यटक
श्रीक्षेत्र आंभोरा श्रावण महिन्यात शिवभक्तांची अलोट गदीॅ
(श्री.मनोहर हारगुडे)
कुही :- श्रावण महिन्याच्या पर्वावर मराठी भाषेची पंढरी समजल्या जाणा-या श्रीक्षेत्र आंभोरा येथे श्री चैतन्येश्वराच्या दर्शनासाठी अलोट गर्दी उसळते. संपूर्ण श्रावण महिन्यात सकाळ पासून सायंकाळ पर्यंत भक्तांची रीघ लागते. जवळपास दरदिवशी हजारो भाविक दर्शन घेतात. भारतीय संस्कृतीत श्रावण महिन्याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक जण श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. भगवान शंकराला श्रावण महिना प्रिय आहे त्यामुळे या महिन्याचे महत्त्व अधिक आहे. ‘ब’ दर्जा प्राप्त असलेल्या या तीर्थक्षेत्रला ‘अ’ दर्जाची मागणी आहे.
नागपूर वरुन पाचगाव, डोंगरगाव, कुही, मांढळ,पचखेडी, वेलतुर 80 किमी आणि भंडारा येथुन 18 किमी अंतरावर कुही तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आंभोरा देवस्थान आहे. याच टोकावर श्री चैतन्यश्वर महादेवाचे प्राचीन मंदीर आहे. स्वामी हरीहरनाथ यांनी या ठिकाणी 12 वर्ष पशुपतीव्रतासह मोठा यज्ञ केला होता याच यज्ञातून महाप्रभू चैतन्यश्वर प्रगटले होते. त्यामुळे येथे चैतन्यश्वराचे (महादेवाचे) देखणे रुद्राक्षरुपी शिवलिंग तयार झाले निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या तीर्थक्षेत्राला सरासरी 900 वर्षापूर्वी अंभ म्हटले जात असे हे मंदीर 960 वर्षापूर्वीचे आहे. मराठीचे आद्य ग्रंथ विवेकसिंधूची रचना याच ठिकाणी शके 1110 (इ सन 1188) ला मुकुंदराजस्वामींनी हरिहरनाथांच्या समाधी समोर केली. येथे स्वामी हरीहरनाथ व त्यांचे शिष्य रामचंद्र उपाख्य रघुनाथ यांची संजिवन समाधी याच ठिकाणी आहे. पहाडावर देखणा कोल्हासुर तर बाजुलाच प्राचीन बौद्ध विहार आहे.
सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या ब्रम्हगिरी पर्वतावरील वैनगंगा, कन्हान, आम, कोलार आणि मुर्झा अशा पंच नद्यांच्या संगमावर वसलेल्या आंभोरा येथे श्रावण महिन्यात, महाशिवरात्रीला व कोदा अमावस्येला मोठ्या संख्येने शिवभक्त गर्दी करीत असतात. भंडारा,गोंदिया,नागपूर, जिल्ह्यांना जोडणारा वैनगंगा नदीवरील ‘ स्टेट ऑफ आर्ट ‘ या आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध झालेला ‘ चैतन्य सेतू ‘केबल पूल परिसरात पर्यटकांचे आकर्षणबिंदू ठरत आहे त्यामुळे भक्तांची व पर्यटकांची गदीॅ दिवसेंदिवस वाढत आहे. दर दिवशी सकाळी व सायंकाळी भगवान शंकराची पूजा आरती होत असते. सजावटीच्या वेगळेपणामुळेच भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटत आहेत भाविकांच्या व्यवस्थेसाठी व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष मा. रत्नाकर ठवकर, सचिव केशवराव वाडीभस्मे, उपाध्यक्ष नरेश ठवकर, सहसचिव कमलेश ठवकर, कोषाध्यक्ष मदन खडसिंगे, प्रा. डाॅ. रामेश्वर पाठेकर, बाबाराव तुमसरे,प्रा. डाॅ. अविनाश तितरमारे, प्रा. सुरेश नखाते, प्रा. संजय तिजारे, पुरुषोत्तम राघोर्ते इ. मंडळी शिवभक्तांच्या सेवेसाठी परिश्रम घेत असतात.