प्रॉपर्टी डिलर यांचा रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला ; अज्ञात आरोपींविरुद्ध कुही पोलिसात गुन्हा दाखल

प्रॉपर्टी डिलर यांचा रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला 

अज्ञात आरोपींविरुद्ध कुही पोलिसात गुन्हा दाखल

कुही : रविवारी सकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने परिसर हादरला आहे. प्रॉपर्टी डिलिंग व्यवसायात कार्यरत असलेले देवराव शामरावजी घरजाळे (वय ५६, रा. शिवांगी नगर, हुडकेश्वर रोड, नागपूर) यांचा अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली.उमरगाव ते पांढरकवडा मार्गावरील वळणाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

सकाळी सुमारे ९ वाजता घरजाळे हे आपल्या नातेवाइक नारायण भेंडे यांच्या अंत्यविधीसाठी मौजा कुसुंबी येथे जाण्यासाठी आपल्या होंडा ड्रीम योगा (क्र. एमएच-४९-डब्ल्यू-४८८९) या दुचाकीवरून निघाले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या कुटुंबियांना फोनवरून माहिती मिळाली की, उमरगाव ते पांढरकवडा मार्गावरील वळणाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

मृतक घरजाळे गळ्यावर धारदार शस्त्राचे खोल घाव होते. गळा अर्धवट कापलेला होता. उजवा डोळा फुटलेला, डोक्यावर, चेहऱ्यावर, कानावर, दोन्ही खांद्यावर, छातीवर, पोटावर तसेच पाठीवर अनेक ठिकाणी वार केल्याचे आढळून आले. या क्रूर हल्ल्यात घरजाळे यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेबाबत मृतकाचा मुलगा मंथन घरजाळे यांनी पोलिसांकडे तोंडी फिर्याद नोंदविली. कुही पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृतक देवराव घरजाळे हे प्रॉपर्टी डिलिंगच्या व्यवसायात भागीदारीत कार्यरत होते. तसेच ते न्यू नागपूर महिला ग्रामीण विकास सह पत संस्थेमध्ये मॅनेजर म्हणून खासगी नोकरी करत होते. या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.या खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि शीतल राणे करीत आहेत.