टिनाचे पत्रे ठोकत असताना छतावरून कोसळून कामगाराचा मृत्यू
हिंगणा : छतावर टिनाचे पत्रे ठोकत असताना वीस फूट उंचीवरून खाली पडल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना हिंगणा एमआयडीसीतील बीएसके इंडस्ट्रीमध्ये घडली. कंपनी व्यवस्थापनाने मृत कामगाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करीत मृतक कामगाराचा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवला होता. यामुळे काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
राजेश पटेल (वय ३२, रा. रीवा, मध्यप्रदेश, हल्ली मुक्काम बुट्टीबोरी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. दरम्यान, हिंगणा एमआयडीसीतील बीएसके इंडस्ट्रीमध्ये ठेकेदाराकडे कामगार म्हणून राजेश पटेल छताचे सिमेंट टिन बसवण्यासाठी आला होता. छप्परचे टीन लावत असताना जवळपास 20 फुटावरून खाली जमिनीवर पडला.

गंभीर जखमी झाल्याने त्याला कंपनी व्यवस्थापनाने डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले. उपचार सुरू करण्याअगोदर नेताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्समध्ये पाठवण्यात आला.


