या दिवशी तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता ; असा राहणार पुढील ५ दिवस हवामान
नागपूर जिल्ह्यासाठी पुढील ५ दिवसकरिता हवामान अंदाज व कृषी सल्ला:
– भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर द्वारा दिनांक ०६ डिसेंबर २०२४ रोजी च्या प्राप्त अंदाजानुसार, नागपूर जिल्ह्यामध्ये, पुढील पाच दिवस दिनांक ०६ ते १० डिसेंबर २०२४ दरम्यान आकाश आंशिक ढगाळ राहण्याची शक्यता,

– दिनांक ०८ डिसेंबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता,
– दिनांक ०६, ०७, ०९ आणि १० डिसेंबर २०२४ रोजी हवामान कोरडे राहण्याची अधिक शक्यता,
– पुढील ५ दिवसा दरम्यान कमाल तापमान २९.८ ते ३१.६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४.३ ते २०.७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता,
– विदर्भामध्ये पुढील ३ दिवसामध्ये किमान तापमानात फारसा बदल होणार नाही त्यांनतर २ ते ३ अंश सेल्सिअस ने घट होईल तर पुढील ५ दिवसामध्ये कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही.
सामान्य सल्ला:
– पावसाचा अंदाज लक्षात घेता कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीची कामे पुढील २ दिवसामध्ये उरकून घेण्यास प्राधान्य द्यावे.. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा.
– परिपक्व अवस्थेतील धान पिकाची कापणी व मळणी पुढील २ दिवसामध्ये उरकून घेण्यास प्राधान्य द्यावे. धान कापणी झाली असल्यास व शेतमाल शेतात पसरून ठेवला असल्यास एकत्र गोळा करून प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. मजुरांची अनुपलब्धता असल्यास कापणी व मळणी कम्बाईन हार्वेस्टर च्या सहाय्याने करण्यास प्राधान्य द्यावे.
– आंतरमशागतीची कामे, पिकास ओलीत करण्याची कामे, कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणी ची कामे तसेच उभ्या पिकामध्ये खते कामे स्थानिक स्वच्छ हवामान परिस्थिती बघून करावी.
– बाजारायोग्य फळे व भाजीपाला पिकाची काढणी करून विक्री करावी.
– कृषी उत्पन्न बाजार समिती व खासगी शेतमाल खरेदी धारकांनी शेतकरी बांधवांद्वारा खरेदीसाठी आणलेला शेतमाल उघड्यावर न साठवता शेड मध्ये साठवावा.
द्वारा: जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, भा. कृ. अनु. प. – केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.



