कुही पंचायत समितीच्या ‘पेन्शन अदालती‘चा फज्जा ; संतप्त सेवानिवृत्त शिक्षकांकडून तीव्र निषेध
कुही : सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित केलेली ‘पेन्शन अदालत’ केवळ फार्स ठरत असल्याचा आरोप करत, महाराष्ट्र प्रदेश उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक महासंघाने सहाय्यक गटविकास अधिकारी प.स.कुही यांच्याकडे निवेदन सोपवून कुही पंचायत समिती प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे. वयोवृद्ध शिक्षकांना वेठीस धरणे आणि नियोजनाचा अभाव यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, पंचायत समिती कार्यालय कुही यांनी २३ डिसेंबर २०२५ रोजी तक्रार निवारण सभा (पेन्शन अदालत) आयोजित केली होती. यासाठी दुपारी ४:०० वाजताची वेळ देण्यात आली होती. दूरवरून अनेक समस्याग्रस्त सेवानिवृत्त शिक्षक वेळेवर हजर झाले. मात्र, तिथे क्रीडा स्पर्धेसंदर्भातील सभा सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत सुरूच होती. तासनतास ताटकळत राहावे लागल्याने आणि सभा वेळेवर सुरू न झाल्याने ज्येष्ठ शिक्षकांना हताश होऊन परत जावे लागले.
पत्र मिळाले सकाळी, सभा होती दुपारी

प्रशासनाच्या कारभाराचा कळस म्हणजे, ६ जानेवारी २०२६ रोजीच्या तक्रार निवारण सभेचे पत्र त्याच दिवशी सकाळी ११:२८ वाजता संबंधितांना प्राप्त झाले. ”सकाळी पत्र मिळाल्यावर दुरवर राहणाऱ्या ज्येष्ठ शिक्षकांनी सभेला पोहोचायचे कसे?” असा संतप्त सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. केवळ कार्यालयीन कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी आणि आपली बाजू खरी ठरवण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांची चेष्टा केली जात असल्याचा आरोप निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षक महासंघाने केला आहे.
प्रशासनाचा केवळ ‘कर्तव्य‘ पार पाडल्याचा देखावा
सेवानिवृत्त शिक्षकांनी आयुष्यभर सेवा दिल्यानंतर, त्यांच्या हक्काच्या पेन्शन कामासाठी वयाचा विचार न करता त्यांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. प्रशासनाकडून केवळ कर्तव्य पार पाडतोय असे भासवले जात असून प्रत्यक्षात मात्र शिक्षकांना उद्विग्न करणारी वागणूक मिळत आहे, अशी भावना निवृत्त शिक्षकांनी व्यक्त केली आहे. ’वयोवृद्ध शिक्षकांना अशा प्रकारे वेठीस धरणे ही बाब खेदजनक आहे.
प्रशासनाने आपली कार्यपद्धती सुधारावी, अन्यथा संघटना अधिक आक्रमक पवित्रा घेईल
या प्रकरणाची गंभीर दखल घेत संघटनेने आपला निषेध नोंदवला असून, निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कुही आणि जिल्हा संघटनेला पाठवण्यात आली आहे. आता यावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवेदन देतेवेळी एकनाथ मांडवे, वसंत ठवरे, अरविंद राऊत, प्रतिभा जयपूरकर, शोभा मोहतुरे, कल्पना ठवकर, भास्कर ठवकर, हेमंत तितरमारे, फोफसे आदी उपस्थित होते.







