नंदीबैल घेऊन आले अन ‘भूतबाधा’ सांगून गंडा घातला ; वेलतूर पोलिसांकडून दोन भोंदूबाबांना बेड्या

नंदीबैल घेऊन आले अन भूतबाधासांगून गंडा घातला ; वेलतूर पोलिसांकडून दोन भोंदूबाबांना बेड्या

आईला गाठून घातली भीती ; तांत्रिक पूजेच्या नावाखाली १.४५ लाखांची फसवणूक

कुही : गावात नंदीबैल घेऊन फिरणाऱ्या दोन भोंदूबाबांनी एका महिलेला गाठून तिला भूतबाधेची भीती दाखविली आणि पुढच्या काही दिवसांतच तिच्या मुलासह संपूर्ण कुटुंबाला दीड लाखांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वेलतूर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथून अटक केली आहे.

असा रचला फसवणुकीचा सापळा

मूळचे वेलतूर येथील रहिवासी असलेले गोविंद विठ्ठल बावणकर (३१) हे कामानिमित्त सुरत (गुजरात) येथे राहतात, तर त्यांची आई वेलतूर येथे गावी एकटीच वास्तव्यास असते. सप्टेंबर महिन्यात आरोपी संदीप वाघमारे व रवींद्र वाघमारे (रा. पालोरा, ता. पारशिवनी) हे नंदीबैल घेऊन गावात आले होते. त्यांनी गोविंद यांच्या आईला घरी एकटे पाहून त्यांना हेरले. “मोठी भूतबाधा आहे,” अशी भीती घालून आरोपींनी त्या माऊलीचा विश्वास संपादन केला.

जडीबुटी देऊन फसवणुकीचा श्रीगणेशा

घाबरलेल्या आईने तातडीने सुरत येथे राहणाऱ्या मुलाला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आईने आरोपींकडून जडीबुटी घेतली व ती मुलाकडे सुरतला निघून गेली. मात्र, आरोपींनी एवढ्यावरच न थांबता पुढे ‘मोठी पूजा’ करण्याचा आग्रह धरला. भूतबाधा पूर्णपणे काढण्यासाठी तांत्रिक पूजा करावी लागेल, असे सांगून आरोपींनी गोविंद बावणकर व त्यांच्या पत्नीला सुरतहून गावी बोलावून घेतले.

दीड लाखांची खंडणीवजा लूट

२३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोपींनी तांत्रिक पूजेचा बनाव रचला. आई, मुलगा आणि सून यांच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेत आरोपींनी तब्बल १ लाख ४५ हजार ५०० रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गोविंद यांनी वेलतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांची धडक कारवाई

नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार व अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनात वेलतूरचे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपी संदीप गोविंदा वाघमारे (२७) आणि रवींद्र नंदू वाघमारे (२५) हे लाखणी (जि. भंडारा) येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना बेड्या ठोकल्या.

जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई

आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३(५) आणि महाराष्ट्र जादूटोणा विरोधी अधिनियम २०१३ च्या कलम ३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वेलतूर पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून, अशा भोंदूबाबांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.