‘पती-पत्नी और वो’; विचित्र प्रेमकथेची ‘हॅपी एंडिंग’
नागपूर : कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. आणि सुखी संसार सुरु झाला. मात्र, दोन वर्षांतच पतीचे एका तरुणीवर प्रेम जडले. लग्न न केल्यास पोलिसांत तक्रार देण्याची धमकी प्रेयसीने दिली. त्याने पत्नीकडे प्रेमप्रकरण आणि प्रेयसीच्या धमकीची कबुली दिली. संसार विस्कळीत होण्याच्या मार्गावर असताना हे प्रकरण भरोसा सेलमध्ये पोहचले. पोलिसांनी पत्नी-पत्नी आणि प्रेयसीचे समूपदेशन करुन विचित्र प्रेमकथेची ‘हॅपी एंडिंग’ केली.
यशोधरानगरात राहणारा आशिष हा मित्रांच्या संगतीत शिक्षण सोडून गुन्हेगारीकडे वळला. यादरम्यान त्याने वस्तीत राहणाऱ्या तनुजा (काल्पनिक नाव) हिच्याशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जात पळून जाऊन लग्न केले. दोघांचा सुरळीत संसार सुरु होता. तनुजाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तनुजा बाळासह माहेरी गेल्यानंतर आशिषचे वस्तीत राहणाऱ्या स्विटी (काल्पनिक नाव) या तरुणीशी सूत जुळले. दोघांचे जवळपास सहा महिने प्रेमप्रकरण फुलले. स्विटीने आशिषला लग्नाचा तगादा लावला. लग्न न केल्यास पोलिसांत तक्रार देण्याची धमकी दिली. त्याने पत्नीकडे संकटात सापडल्याचे सांगून कबुली दिली. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून आशिष लग्नासाठी तयार झाला. एकाच घरात पहिल्या पत्नीसह राहण्यास स्विटी तयार झाली. परंतु, पत्नी तनुजाने लग्नास विरोध दर्शविला.

विचित्र स्थिती निर्माण झाल्यामुळे तनुजाने भरोसा सेल गाठले. पती व स्विटीची लेखी तक्रार केली. भरोसा सेलच्या पोलीसांनी तिघांचेही समूपदेशन करीत, आशिषला गुन्हेगारी प्रवृती सोडून व्यवसायाकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले. स्विटीने आशिषचा नाद सोडून आपल्या नातेवाईक युवकाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे पोलिसांनी प्रेमाच्या त्रिकोणातील गुंता सोडवला.


