लोहारा गावाजवळ ट्रॅक्टर उलटला; चालकाचा जागीच मृत्यू

लोहारा गावाजवळ ट्रॅक्टर उलटला; चालकाचा जागीच मृत्यू

जांब/भंडारा : तुमसर तालुक्यातील लोहारा गावाजवळील एका वळणावर दि.७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान भीषण अपघात घडला. धोपकडे गिट्टी घेऊन जाणारा भरधाव ट्रॅक्टर उलटला. त्यात ट्रॅक्टरचालकाचा ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. जितेंद्र राऊत (५५) रा. मिटेवाणी असे मृतकाचे नाव आहे.

मोहाडी तालुक्यात ६ डिसेंबर रोजी दोन अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू होऊन १६ मजूर जखमी झाले होते. सातोना-बीड रस्त्यावर करण बांते नामक तरूणाला भरधाव ट्रेलरने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. तर दुसरी घटना करडी जवळील पावर हाऊस जवळ मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो उलटला. त्यात ज्ञानेश्वर शेंदरे रा.उसगाव या मजुराचा मृत्यू झाला तर १७ मजूर जखमी झाले. त्यातील एक जखमी मजूर मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेची शाही वाळते न वाळते दि.७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान गिट्टी भरून जाणारा ट्रॅक्टर लोहारा गावाजवळ नहराजवळील वळणावर ट्रॅक्टरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने उलटला. त्यात ट्रॅक्टरचालक जितेंद्र राऊत याचा जागीच मृत्यू झाला. मृतक हा दावेझरी येथील बुधराज पटले नामक मालकाकडे ट्रॅक्टरचालक म्हणून कामाला होता. तो आज आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर क्र.एम.एच.३६/सी.७४७ या ट्रॅक्टरमध्ये गिट्टी भरून धोप गावाकडे जात असताना लोहारा गावाजवळ अपघात घडला. त्यात चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात व परिसरात होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंधळगावचे ठाणेदार सुनील राऊत यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी जाऊन मृतकाला बाहेर काढले. घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. अपघाताची नोंद आंधळगाव पोलिसात केली आहे.