नागपूर : कर्मचाऱ्यांनीच घातला कंपनीला तब्बल ५ कोटींनी गंडा
नागपूर : कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच चक्क ४ कोटी ८३ लाख ३० हजारांचा मोठा घोटाळा केला. ही बाब ज्यावेळी कंपनीच्या मालकाच्या लक्षात आली, त्यावेळी त्याने लगेचच पोलिसात धाव घेतली. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये. हैराण करणारे म्हणजे यात एक – दोन नाही तर तब्बल सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिहानमधील हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडला कर्मचाऱ्यांनीच ४ कोटी ८३ लाख ३० हजार रुपयांनी गंडा घातला. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी सात कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गेल्या काही वर्षांपासून हे मिळून घोटाळा करत असल्याचे देखील उघड झालंय. जयंत समीर दास, आदित्य वसंत डोंगरे, पीयूष योगेश सोडारी, मुकेश कुमार, पवन प्रल्हाद चचाने, अजिंक्य प्रदीप मेश्राम व सुरेंद्र हरिराम आगाशे, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. महाव्यवस्थापक अरविंद विनोद मालगुंड (वय ४१, रा. जयंतीनगरी, बेसा पिपळा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, हेक्सावेअर कंपनी ग्राहकांना ई-कामर्स सेवा प्रदान करते. ऑनलाइन खरेदी केलेली वस्तू पसंत न पडल्यास ती ग्राहक परत करतात. ग्राहकांना त्यांचे पैसे परत करण्यात येतात. २९ डिसेंबर २०२३ ते २७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सात जणांनी बोगस ग्राहकांच्या नावे आयडी तयार केला. त्यांना ४ कोटी ८३ लाख ३० हजार १६८ रुपये परत केले. परंतु, वस्तू परत घेतल्या नाहीत. चौकशीदरम्यान हा प्रकार समोर आला. मालगुंड यांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


