फिल्मी डायलॉग मारत बिल्डरकडे खंडणी मागणाऱ्या गुंडाला पोलिसांनी केली अटक
नागपूर : एक कुख्यात गुन्हेगार बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयात जातो आणी त्याला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडून तब्बल 7 लाखांची खंडणी मागतो. विशेष म्हणजे जेल माझं घर आहे. तुला काय करायचं ते कर, असंही हा आरोपी म्हणतो. आपल्याला पोलिसांचं कोणतंही भय नाही, असंही तो त्याच्या वागणुकीतून दाखवतो. त्याने काही दिवसांपूर्वी टास्क फोर्समधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पण या गुन्हेगाराच्या मनात पोलिसांबद्दल भीती निर्माण होईल का? असा प्रश्न आहे. खंडणी मागणाऱ्या लक्की ऊर्फ गुज्जर गौरे (वय २१) याला पोलिसांनी अटक केली आहे.
मनमोहन ओमप्रकाश मुंदडा (वय ४८) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. सदर परिसरात त्यांची सात मजली इमारत उभारणीच्या अंतिम टप्प्यात आहे. रविवारी सायंकाळी आरोपी लक्की त्यांच्या साईटवर गेला आणि थेट मुंदडा यांना चाकूचा धाक दाखवत धमकावत म्हणाला, “तुझं सात मजली इमारतीचं काम सुरू आहे, तुझी सात करोडची स्कीम सुरू आहे तर मला सात लाख रुपये हप्ता लागेल. जर तुला एकसोबत द्यायचे असेल तर दे, नाहीतर इंस्टॉलमेंटने दे, आणि माझ्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत, मला काही फरक पडत नाही. जेल माझं घरच आहे! असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मनमोहन ओमप्रकाश मुंदडा यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची दखल घेत आरोपी लक्की याला अटक केली.
कुख्यात गुंड लक्की ऊर्फ गुज्जर दोन महिन्यांपूर्वी एमपीडीएखाली अटकेतून सुटल्यावर पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाला. त्याच्यावर चोरी, घरफोडी, मारहाण, दहशत पसरविणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याने मध्यप्रदेशात स्पेशल टास्क फोर्सच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणात तो सध्या फरार होता. नागपूरमध्ये बिल्डरकडून खंडणी मागितल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.



