कोराडी मंदिरात अपघात, बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला; १३ कामगार जखमी, दोन गंभीर, NDRF कडून मदतकार्य सुरू

कोराडी  मंदिरात अपघात, बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला; १३ कामगार जखमी, दोन गंभीर, NDRF कडून मदतकार्य सुरू

नागपूर : कोराडीतील महालक्ष्मी मंदिराच्या भव्य प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू असताना शनिवारी रात्री अचानक स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात तब्बल १३ मजूर गंभीररीत्या जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी NDRF चे पथक, पोलीस व प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत बचावकार्य केले.

शनिवारी रात्री सुमारे ८ वाजता मंदिराच्या मागील बाजूस उभारण्यात येत असलेल्या चौथ्या क्रमांकाच्या गेटजवळ स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. चार कॉलमवर टाकण्यात आलेली सेंट्रींग अचानक कोसळली आणि त्यासह संपूर्ण स्लॅब कोसळून मजूर थेट मलब्याखाली दबले. घटनास्थळी धूळ, सिमेंटचे तुकडे आणि आरडाओरड यामुळे काही काळ भीषण परिस्थिती निर्माण झाली.जखमींना तातडीने ढिगाऱ्यातून बाहेर काढून नंदिनी रुग्णालय, मॅक्स रुग्णालय तसेच स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस उपायुक्त निकेतन कदम, कोराडी पोलिस, NDRFचे जवान व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी धावले. परिसरात मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला.स्लॅब कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांधकामादरम्यान सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी सुरू आहे. या भीषण घटनेमुळे मंदिराचे विस्तारीकरणाचे काम तात्पुरते थांबवण्यात आले असून, अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तपास वेगात सुरू आहे.