सख्या भावाने केली मित्राच्या मदतीने भावाची हत्या
तुमसर : शहरातील आंबेडकर नगर (आंबा टोली) येथील रोशन प्रकाश वासनिक (वय ३५) या युवकाची हत्या सख्ख्या भावानेचे केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बुधवार, दि. ६ ऑगस्ट दुपारी घडलेल्या या प्रकरणावर हत्या की नैसर्गिक मृत्यू?’ असा थेट सवाल उपस्थित केला होता. अखेर पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, ही हत्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, रोशनचा खून त्याच्याच सख्ख्या भावाने मित्रासोबत केल्याचे निष्पन्न झाले आहे. रोहन वासनिक रा. आंबेडकर नगर तुमसर व त्याचा मित्र लारा किरण मारबते(२८) रा. माकडे नगर असे आरोपींची नावे आहेत.
मृतक रोशन वासनिक गेल्या काही वर्षांपासून मद्यप्राशनाच्या आहारी गेला होता. वडिलांच्या निधनानंतर त्याचे मानसिक संतुलन डळमळीत झाले होते. तो वारंवार आपल्या आईशी उद्धटपणे वागत असे. या वागणुकीमुळे कुटुंबात तणाव वाढला होता. बुधवार, दि. ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान रोशनने पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत आईशी गैरवर्तन केले. त्याच वेळी लहान भाऊ रोहन वासनिकने रागाच्या भरात रोशन च्या डोक्यावर वीट फेकून मारली. जखमी अवस्थेत रोशन घरी परतून झोपला. घटनास्थळाजवळच राहणारा मित्र लारा मारबते हा काही वेळाने रोशनकडे गेला. त्याने देखील रागाच्या भरात लाथाबुक्क्यांनी आणि काठीने रोशनवर हल्ला चढवला. काही तासांनी रोशन हा आईला मृतावस्थेत आढळून आला.

घटनेनंतर तुमसर पोलिस आणि जिल्हा गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी, जबाब नोंद या आधारे पोलिसांनी रोहन वासनिक आणि लारा मारबते या दोघां मित्रा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. गुरुवार, दि. ७ ऑगस्ट रोजी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना दि. ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


