कुही तालुक्यात विजांचा तांडव सुरूच
वीज कोसळून 8 शेळ्यांचा मृत्यू तर 1 शेळी गंभीर जखमी
कुही :- तालुक्यातील मौजा- चापेगडी येथे चारायला नेलेल्या शेळ्यांवर वीज पडून ८ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर १ शेळी गंभीर जखमी झाली आहे. यात शेळी मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

गेल्या तीन दिवसांत तालुक्यात वीज गर्जनेच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत असून सोमवारी तालुक्यात ठीकठिकाणी पावसासह वीज गर्जना पाहायला मिळाली. यात दुपारी २.१५ च्या सुमारास चापेगडी शिवारात चारायला नेलेल्या शेळ्यांवर वीज कोसळल्याने यात चापेगडी येथील रंगलाल मांढरे यांच्या ३, सुखदेव तळेकर यांची १ तर ईश्वर सिंदूरकर यांच्या ४ अश्या एकूण ८ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला असून सिंदूरकर यांची 1 शेळी गंभीर जखमी झाली आहे. यात शेळी मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनातर्फे शेळीमालकांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी चापेगडी ग्रामपंचायतचे उपसरपंच लालकृष्ण जौजाळ यांनी केली आहे.



