वीज कोसळण्याचे प्रमाण पाहता शेतकऱ्यांनो काळजी घ्या – तहसीलदार हिंगे

वीज कोसळण्याचे प्रमाण पाहता शेतकऱ्यांनो काळजी घ्या – तहसीलदार हिंगे

कुही :- तालुक्यात  गेल्या 3 दिवसांपासून विजेमुळे घातपाताच्या घटनेत वाढ झाली आहे. तेव्हा शेतशिवारात काम करताना शेतकर्‍यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन कुहीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.

शनिवारी कुही येथील शेतकरी महिला हटवार   तर सिल्ली येथील गाय, रविवारी भोजापूर शिवारात बाभळीच्या झाडाखाली भगवान शंभरकर व सोमवारी चापेगडी येथील ८ बकर्या असा 3 दिवसात 2 शेतकरी व 9 जनावरांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा पाहता तालुक्यात शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरीकांनी व  शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार हिंगे यांनी केले आहे.

  • वीज कोसळण्याने होणारे नुकसान आणि उपशमन

काही लोक वादळाची चिन्हे दिसली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे ऐनवेळेला वादळात योग्य आसरा न मिळाल्याने मृत्यू पावतात किंवा गंभीर जखमी होतात.वीज कोसळल्याने होणाऱ्या धोक्याबद्दल माहिती देणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांचा दृष्टिकोन हे धोके कमी करण्याचा असतो. हे कार्यक्रम विशेषतः ग्रामीण भागात जिथे लोक मोकळ्या जागांवर किंवा शेतात काम करतात, अशा लोकांना अनुलक्षित करणारे असावेत. कोणत्याही व्यक्तीला जास्तीत जास्त सुरक्षित ठिकाणी आसरा मिळाला पाहिजे. लोकांनी मोकळ्या जागेत असतांना शक्यतो लहान टेकडी, एकाकी झाड आणि झेंड्याचे खांब, प्रक्षेपण मनोरे अशा माणसांनी बनवलेल्या पण आजूबाजूच्या जमिनीपेक्षा फार उंच असलेल्या जागांचा आश्रय टाळावा; तसेच विजेपासून संरक्षण मिळण्यासाठी कोणत्याही जागा पूर्णपणे सुरक्षित नसतात पण तरीही बंदिस्त इमारती किंवा चारचाकी वाहने, ट्रक, बस, व्हॅन, शेतातील बंदिस्त वाहने ही त्या मानाने बरीच सुरक्षित, आसरा घेण्यासारखी ठिकाणे आहेत. भारतात वीज कोसळण्यामुळे होणारे जास्तीत जास्त मृत्यू हे शेतावर काम करणाऱ्या लोकांचे असतात. उदा. महाराष्ट्रात विजेमुळे होणाऱ्या एकूण मृत्युंपैकी ८६ टक्के मृत्यू शेतावर काम करणाऱ्या व्यक्तींचे असतात.

वीज ही गुराढोरांसाठीही अनिष्टच असते. वादळात बहुधा गुरेढोरे झाडाखाली एकत्र गोळा होतात आणि विजेच्या एका झटक्याला अनेक गुरे बळी पडतात. वादळी हवा जाणवताच गुरांना गोठ्यामध्ये किंवा प्राधान्याने जिथे वीजप्रतिबंधक योजना असते अशा सुरक्षित ठिकाणी नेऊन धोका कमी करता येऊ शकतो.

विद्युत व टेलिफोनच्या तारा ह्या जमिनीखालून नेण्यामुळे वीज कोसळण्याने होणारे नुकसान खूपच कमी होते. परंपरागत पद्धतीने खांबावरून जाणाऱ्या तारा विद्युत प्रवाहाबरोबरच विजेलाही इमारतीपर्यंत वाहून नेतात, त्यामुळे घरातील विद्युत उपकरणांचे आणि इमारतींचेही नुकसान होते.

* हे करा

१) तुम्ही घराबाहेर असाल, तर त्वरित आसरा शोधा, इमारत हा सुरक्षित आसरा आहे; पण इमारत नसेल तर तुम्ही गुहा, खड्डा किंवा खिंडीसारख्या भागात आश्रय घ्या. झाडे ह्यासाठी कधीच सुरक्षित नसतात. उंच झाडे स्वत:कडे विजेला आकर्षित करतात.

२) तुम्हाला आसरा मिळाला नाही, तरी परिसरातील सर्वा उंच जागा टाळा. जर जवळपास फक्त उंच झाडे असतील, तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर थांबा, जमिनीवर बाका किंवा वाकून बसा.

३) घरातच राहा किंवा बाहेर असाल, तरघरी जा ! जर वादळाची चाहूल लागली, तर अगदी गरजेचे नसेल तर बाहेर जाणे टाळा. लक्षात ठेवा • विजेचा प्रकाश आणि आवाज ह्यातील अंतर जितके सेकंद असेल, त्याला तीनने भागले असता वी ज्या ठिकाणी कोसळली तिथपर्यंतचे अंतर किलोमीटरमध्ये अंदाजे कळू शकते.

४) जेव्हा विजा चमकणे किंवा वादळ खूप जोरात चालू असेल, तेव्हा विजेच्या सुवाहकांपासून दूर रहा. उदा. धुराडी, रेडिएटर्स, स्टोव्ह, धातूचे नळ, ओल्या जागा आणि टेलीफोन.

५) पाण्यातून तात्काळ बाहे या छोट्या नावेतून पाण्यातून जात असाल तरीही.

६) जर तुम्हाला विद्युत भारित वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील; तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.

* हे करू नका

१) विद्युत उपकरणे चालु करुन वापरु नका. जसे की हेअर ड्रायर, विद्युत टूथब्रश किंवा विद्युत रेझर, जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली, तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो.

२) वादळात टेलिफोनचा वापर टाळा. वीज टेलिफोनच्या घरावरील तारांमधुन वाहू शकते.

३) बाहेर असतांना धातूच्या वस्तूंचा वापर टाळा.