मोटारपंपाची लाईट सुरु करताना करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू ; पहाटे उसाला पाणी देण्यासाठी गेला असता घडली घटना

मोटारपंपाची लाईट सुरु करताना शेतकऱ्याचा मृत्यू 

पहाटे उसाला पाणी देण्यासाठी गेला असता घडली घटना

 

कुही :- तालुक्यातील मौजा-सावळी  येथे पहाटे शेतातील मोटारपंप सुरु करायला गेलेल्या शेतकऱ्याला मोटारपंप सुरु   करत असताना विजेचा जोरदार धक्का लागला असून यात शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला आहे.

आजघडीला रब्बी हंगामातील शेतपिकांची पेरणी सुरु असून अनेकजण ओलीत करून पेरणी करत आहेत. तर यंदा उसतोड मजूर उशिरा येणार असल्याने उस उत्पादक शेतकरी उसाला पाणी देत आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील मौजा- सावळी येथील रहिवासी  शेखर डोमाजी काकडे (वय-४३ ) हे त्यांच्या शेतातील उसाला पाणी देण्यासाठी पहाटे ५.३० वाजता घरून निघून गेले होते. ते याआधी पहाटे गेल्यावर ८ ते ९  वाजेपर्यंत घरी येऊन जात होते. मात्र आज ते बराच वेळ होऊनही  परत आले नाही म्हणून घरच्यांनी त्यांना फोन केला मात्र ७ ते ८ वेळा फोन करूनही कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने अखेर शेतात जाऊन पहिले असता ते पडून दिसले. लागलीच त्यांना कुही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मृतक शेतकरी  शेखर काकडे  हे घरातील कर्ता पुरुष असून त्यांच्या निधनाने दोन लहान लेकरे पोरकी झाली असून पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.