पचखेडी येथे श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप ; पचखेडी येथील हनुमान मंदिरात भक्तिमय वातावरणात सोहळा.

मनोहर हारगुडे
पचखेडी :- हनुमान देवस्थान पंचकमेटी व ग्रामवासीयांच्या वतीने कुही तालुक्यातील पचखेडी (गां.) येथे २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे भक्तीमय वातावरणात हनुमान मंदिरात आयोजन करण्यात आले. सप्ताहाचे भागवताचार्य हभप भूषण महाराज शिंगरवाडे यांच्या ओजस्वी वाणीने सप्ताह पार पडले.

सोहळ्यात शंकर महाराज कावळे, पौर्णिमा ईटनकर, वैष्णवी तीतरमारे, भुषण महाराज शिंगरवाडे यांची किर्तने, सागर महाराज नांदुरकर यांचा भारुड तर संदीप महाराज तायवाडे यांचा जागृती किर्तन घेण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने काकड आरती, रामधुन, प्रवचन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, गोवर्धन पुजा, भजन आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आली. समारोपाच्या दिवशी जय जय रामकृष्णहरीच्या निनादात गावातून रामधुन काढण्यात आली. यामध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, छत्रपती शिवाजी महाराजांची गावातील मुलांनी परिधान केलेली वेषभूषा व अश्व आकर्षक ठरली. गावातील रामधुन मार्ग आकर्षक रांगोळीने सजवण्यात आले.
गावातील संपूर्ण भजन मंडळ, पुरुष, महीला, युवक व मुकुंदराजस्वामी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रामधुनमध्ये उत्साहात सहभाग घेतला होता. या निमित्ताने सामाजिक उत्तरदायित्त्व म्हणून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. गोपाल काल्याचे किर्तन व महाप्रसाद वितरणाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.







