प्रेयसीला भेटून आला ; लग्नाचा आठ दिवसाअगोदरच तरुणाची गळफास घेत आत्महत्त्या
नागपूर : नागपुरात धक्कादायक घटना घडली. एका 22 वर्षीय तरूणाने गळफास लावत आत्महत्या केली. ही घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत दत्तवाडीच्या धम्मकीर्तीनगरात घडली. प्रज्ज्वल दिलीप मेश्राम (वय 22) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. विशेष म्हणजे रविवारी त्याचा वाढदिवस होता आणि 17 मार्च रोजी त्याचे लग्नही होते. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ज्वल हा भूखंड विक्री करणाऱ्या कंपनीत सल्लागार म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी सायंकाळी तो काम आटोपून घरी परतला. त्यावेळी त्याला प्रेयसी ज्योत्स्ना (काल्पनिक नाव) हिचा फोन आला. त्यामुळे तो तिला भेटण्यासाठी गेला. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर जेवण करून तो खोलीत झोपायला गेला. पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक आई ललिता मेश्राम या उठल्या. त्या प्रज्ज्वलला पाहण्यासाठी खोलीत गेल्या असता दार आतून बंद होते. त्यांनी बराच वेळ दार ठोठावले. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मागील खिडकीतून आत डोकावून पाहिले असता प्रज्ज्वल पंख्याला ओढणीच्या साह्याने लटकलेला दिसला. आरडाओरड होताच शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाडी पोलिसांनाही सूचना देण्यात आली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवला. आत्महत्येमागे वेगळे काही कारण आहे का? याबाबत वाडी पोलिस पुढील तपास करीत आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, प्रज्ज्वलचा 17 मार्च रोजी न्यायालयात प्रेमविवाह ठरला होता. मात्र, प्रेयसी ज्योत्स्ना वारंवार त्याच्याशी लग्नाबाबत चर्चा करत असल्यामुळे तो काही दिवसांपासून तणावात होता. परिणामी, मानसिक तणावातून त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, 9 मार्च रोजी प्रज्ज्वलचा वाढदिवस होता, त्यामुळे त्याच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


