कुहीतील मुख्य मार्ग पुन्हा चर्चेत ; रस्त्या संदर्भात येताहेत तक्रारी
कुही:- शहरातील बहुचर्चित मुख्य रस्त्याच्या उर्वरित कामाला अखेर सुरवात झाली आहे.मात्र रस्ता रुंदीकरण न करता आहे तेवढ्याच जागेत रस्त्याचे काम करणे सुरू असून सुरवातीलाच रस्त्यासंदर्भात अनेक तक्रारी पुढे येत असल्याने या रस्त्याचे काम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
मागील अनेक वर्षांपासून शहराच्या मध्यभागातून जाणारा पंचायत समिती ते ना.डी. सेंट्रल को-ऑपरेटीव्ह बँक ते शारदा चौक अण्णाभाऊ साठे चौक या रस्ता बांधकामाची मागणी होत होती. अखेर तत्कालीन आमदार राजू पारवे यांच्या पुढाकाराने निधी प्राप्त होऊन पहिल्या टप्प्यात पंचायत समिती ते ना.डी. सेंट्रल को-ऑपरेटीव्ह बँक ते शारदा चौक या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले.त्यात उर्वरित पुढील मार्ग हा रुंदीने अतिशय कमी असल्याने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी मोजणी प्रक्रिया पार पडली. त्यातही जुन्या गावठाणाचे रस्त्या प्रमाणे बांधकाम करण्याचे ठरवले. त्यात नगरपंचायतने नव्याने निविदा प्रक्रिया काढून उर्वरित रस्त्यासाठी 87 लाख 95 हजार 987 रुपयांचे कंत्राट एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले. यात शारदा चौकापासून ते अण्णाभाऊ साठे चौक(मांढळ रोड) पर्यंत सिमेंट काँक्रेटचे काम देण्यात आले आहे. मात्र सदर रस्त्यालगत दाट लोकवस्ती असून रस्त्याची उंची जास्त न वाढविण्याबाबत स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.कारण रस्त्याची उंची जास्त वाढल्याने पावसाळ्यात थेट नागरिकांच्या घरात रस्त्यावरील पाणी शिरण्याची भीती आहे.तेव्हा रस्त्याची अंदाजपत्रकात नमूद मापकाप्रमाणेच रुंदी राहणार असून रस्त्यावरील पाणी नालीतच जाईल याची खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला दिल्याचे नगरपंचायतचे बांधकाम अभियंता दत्तात्रय साठे यांनी सांगितले.

अन रस्त्याच्या कामात मुरुम ऐवजी मातीमिश्रित भिस
संबंधित रस्ता बांधकाम सदर कंत्राटदार हे मुरुम ऐवजी मातीमिश्रित भिसाचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्ता कामात अनियमितता होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवले आहे. त्यात गेल्या दीड महिन्यापासून शहरात भीषण पाणीटंचाई असून हाच रस्ता कामात खोदकाम करताना कंत्राटदाराच्या बेजबाबदार पणामुळे मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले होते.पाईपलाईन फुटलेल्या ठिकाणापासून जवळपास 500 मीटर पर्यंत हे पाणी वाहून गेले तर जणू मुख्य मार्गाने नालाच वाहत असल्याचे चित्र दिसत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र हे सगळे असूनही नगरपंचायत संबंधित कंत्राटदार याची पाठराखण करत असून कंत्राटदाराने फोडलेली पाईपलाईन नगरपंचायतने स्वताचे मजूर लाऊन दुरुस्त केल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.


