विद्युत तार चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या ; कुही पोलिसांची कारवाई
कुही :- पोलीस स्टेशन कुही हद्दीतील मौजा नवरगाव येथून शेतातून विद्युत तार चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा कुही पोलिसांनी एका दिवसात छडा लावत मुसक्या आवळल्या आहेत.
तालुक्यातील मौजा-नवरगाव येथील कोल्हे फळबागीच्या मध्ये असलेल्या १५०० फुट विद्युत कंडक्टर तार व ७० फुट जिआय तार असा एकूण २८ हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार गुरुवारी (दि.८ ऑगस्ट) रोजी कुही पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. लागलीच कुही पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूला विचारपूस केली असता एका शेतमजुराने लाल रंगाच्या ऑटो मध्ये माल नेल्याचे पाहिले असल्याचे सांगितले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या एका दिवसातच संशयित शेख असलम शेख नूर(वय-३३) व शेख रसूल शेख (वय-६०) दोघेही रा.मोठा ताजबाग यांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही चोरी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्या कडून चोरी गेलेला १५०० फुट विद्युत कंडक्टर तार व ७० फुट जिआय तार असा एकूण २८ हजार रुपयांचा मालासह चोरीसाठी वापरलेला 1 लाख २५ हजार रुपये किमतीचा लाल रंगाचा मालवाहू ऑटो क्र. एमएच ४९ एआर ५३०८ जप्त केला आहे. हि कारवाई कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि स्वप्नील गोपाले, पोहवा. ओमप्रकाश रेहपाडे, अनिल करडखेडे, राहुल देवीकर यांनी केली आहे.