Home क्राईम दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून ‘लिव्ह इन पार्टनर’वर प्राणघातक हल्ला ; आरोपी...

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून ‘लिव्ह इन पार्टनर’वर प्राणघातक हल्ला ; आरोपी युवक फरार

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून ‘लिव्ह इन पार्टनर’वर प्राणघातक हल्ला ; आरोपी युवक फरार

नागपूर: ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या प्रेयसीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका तरुणाने तिच्यावर चाकूने हल्ला केला. मांडी व पायावर वार करून गंभीर जखमी केले. ही खळबळजनक घटना गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत गाडीखाना परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी जखमी प्रेयसीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. योगेश चंद्रभान खरकर (३६) असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही ११ वर्षाच्या मुलासह गत एक वर्षांपासून आरोपी योगेश याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहात आहे. तिघेही गाडीखाना परिसरात भाड्याच्या खोलीत राहतात. आरोपी योगेशला दारूचे व्यसन आहे. तो कुठलेही काम करीत नाही. महिला लोकांच्या घरी काम करून तिघांचाही उदरनिर्वाह करते. योगेश वारंवार महिलेकडे दारूसाठी पैसे मागत असे व नकार दिल्यास शिवीगाळ व धमकी द्यायचा. सकाळचा सुमारास योगेशने पुन्हा महिलेला दारूसाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने योगेश संतप्त झाला. रागाच्या भरात त्याने घरातील भाजी कापण्याचा चाकू उचलून महिलेवर हल्ला केला. महिलेच्या डाव्या मांडीवर व पायावर चाकूने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. महिलेने जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पळ काढला.

भांडणाचा आवाज ऐकून शेजारी बाहेर गोळा झाले होते. लोकांना पाहताच योगेश तेथून पसार झाला. जखमी महिलेला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर महिलेने गणेशपेठ पोलिस ठाण्यात जाऊन योगेशविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

Don`t copy text!