कुहीत ‘मुले चोर टोळी’ची अफवा
भिक्षा मागणाऱ्या दोन महिलांना संशयावरून पकडले, पोलिसांची स्पष्टता
कुही प्रतिनिधी : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुले चोर टोळी संदर्भातील अपूर्ण व खात्री नसलेले अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमुळे ग्रामीण भागातील गाव-खेड्यांत अफवांना मोठे पेव फुटले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मंगळवारी कुही शहरात दोन महिला मुले चोरणाऱ्या असल्याचा संशय व्यक्त करत त्यांना पकडल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र या प्रकरणाची माहिती कुही पोलीस ठाण्याकडून घेतली असता वेगळीच बाब समोर आली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर दोन्ही महिला चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील चिंदीमल गावच्या रहिवासी आहेत. रमजान महिन्याच्या निमित्ताने त्या मुस्लिम समाजाच्या घरांमध्ये जाऊन भिक्षा मागतात. मंगळवारी त्या भिक्षा मागण्यासाठी कुही येथे आल्या होत्या.

नवीन बस स्टॉप परिसरातील एका घरावर हिरवा झेंडा दिसल्याने ते घर मुस्लिम बांधवांचे असावे असा समज करून त्या तिकडे गेल्या. मात्र ते घर मुस्लिम समाजाचे नसल्याचे लक्षात येताच त्या लगेच परत निघाल्या. यावेळी घरातील लहान मुलांना भीती वाटल्याने संशय निर्माण झाला.
अचानक दोन महिला घरासमोर आल्याने व लगेच परत जात असल्याने त्या मुले चोरणाऱ्या असाव्यात असा संशय व्यक्त करण्यात आला. आरडाओरडा झाल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले आणि जमावाने दोन्ही महिलांना घेरले. त्याचवेळी काहींनी या घटनेचे व्हिडिओही तयार केले.
घटनेची माहिती मिळताच कुही पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. तसेच त्यांच्या मूळ गावातही चौकशी करण्यात आली असता त्या महिला भिक्षा मागून उपजीविका करत असल्याचे स्पष्ट झाले.
पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही संशयास्पद घटना दिसल्यास स्वतः कारवाई न करता त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.
टीप- सदर पोर्टल हे वाचकांसाठी आहे स्वयंघोषित पत्रकारांसाठी नाही, तेव्हा कॉपी पेस्ट करताना जरा लाज बाळगा.







