टू-व्हीलरवर बायकोची बॉडी बांधून घेऊन निघालेला पती : कारण ऐकून तुमचंही मन हेलावेल , व्हिडिओ तुफान व्हायरल

टू-व्हीलरवर बायकोची बॉडी बांधून घेऊन निघालेला पती : कारण ऐकून तुमचंही मन हेलावेल , व्हिडिओ तुफान व्हायरल

नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मदतीसाठी आर्त हाक मारूनही कोणीच मदतीला न आल्याने हतबल पतीने अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. ही हृदयद्रावक घटना देवलापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील रहिवासी असलेले अमित भुरा यादव (३५) आणि त्यांची पत्नी ग्यारसी अमित यादव हे मागील दहा वर्षांपासून नागपूर जिल्ह्यातील लोणारा, कोराडी परिसरात राहत होते. रक्षाबंधन असल्याने हे दाम्पत्य मोटारसायकलवरून लोणारा येथून मध्यप्रदेशातील करणपूरला जात होते. मोरफाटा परिसरात मागून वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला कट दिला. त्यामुळे ग्यारसी यादव दुचाकीवरून रस्त्यावर पडली आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घाबरलेला ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. पत्नीचा मृत्यू डोळ्यांसमोर झाल्याने अमित यादव हतबल झाले. त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना हात जोडून, डोळ्यांतून अश्रू पुसत मदतीची याचना केली, परंतु कोणतेही वाहन थांबण्यास तयार नव्हते. माणुसकीला लाज आणणाऱ्या या परिस्थितीत अमित यादव यांनी शेवटी पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीवर बांधला आणि घरी घेऊन जाण्यासाठी मार्गस्थ झाले.

मृतदेह दुचाकीवर बांधून जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तो झपाट्याने व्हायरल झाला. मृतदेह पाहून काहींनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला मदत न मिळाल्याने आणि भीतीने ते थांबायला तयार नव्हते. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी अमित यादव यांना अडवून मृतदेह ताब्यात घेतला. ग्यारसी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या या व्हिडिओवरून लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.