सामाजिक कार्यातून नेतृत्वाचा मार्ग; समीक्षा प्रणय मेश्राम निवडणुकीस सज्ज ; वेलतूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये नव्या नेतृत्वाची चाहूल…

स्वप्नील खानोरकर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेलतूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये नवे समीकरण तयार होत असून, सामाजिक कार्यातून आपली ओळख निर्माण केलेल्या समीक्षा प्रणय मेश्राम या उमेदवारीस सज्ज झाल्या आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला हात देत कार्यरत असलेल्या प्रणय मेश्राम यांच्या पत्नी समीक्षा या आता जनतेच्या सेवेसाठी राजकारणाच्या मैदानात उतरल्या आहेत.प्रणय मेश्राम यांनी यापूर्वी पचखेडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक लढवली होती. अत्यल्प मताधिक्याने झालेल्या पराभवानंतरही त्यांनी जनतेचा विश्वास गमावला नाही, उलट तो अधिक दृढ केला. “जनसेवा हीच ईश्वरसेवा, समाजसेवा हीच देशसेवा” या विचारावर ठाम राहून त्यांनी दिव्यांग, कष्टकरी शेतकरी, महिला बचत गट, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकास या क्षेत्रात सातत्याने कार्य सुरू केलं त्यामुळे ते आजही जनतेच्या मनातील सरपंच आहेत.या कार्याची छाप इतकी ठळक आहे की, वेलतूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये समीक्षा मेश्राम यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. परिसरातील महिला, शेतकरी, दिव्यांग आणि युवकवर्ग यांच्याकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

स्वतः प्रणय मेश्राम यांनी सांगितले की,”ग्रामीण भागातील पाणी, आरोग्य, रस्ते आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर ठोस बदल घडवून आणणे हेच आमचे ध्येय आहे. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” प्रणय मेश्राम हे मनमिळावू स्वभाव, अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका, शिक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन आणि निवेदने अशा भूमिकांमुळे वेलतूर परिसरात परिचित आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी अल्पमताने पराभव स्वीकारला असला तरी, त्यांच्या कार्यामुळे जनतेच्या मनात सहानुभूती आणि विश्वास निर्माण झाला आहे.
त्यांनी निवडणुकीची वाट न बघता अर्ध्यापेक्षा जास्त मतदारसंघ पिंजून काढला आहे. फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करण्याची वृत्ती, जनतेत मिसळण्याची हातोटी आणि विकासाची निष्ठा या गुणांमुळे ते आणि त्यांची पत्नी समीक्षा मेश्राम या दोघांनी लोकांच्या मनात वेगळा ठसा उमटवला आहे.वेलतूर सर्कलमध्ये वाढता जनाधार, कार्याचा ठसा आणि लोकांचा विश्वास पाहता या निवडणुकीत समीक्षा मेश्राम या एक बलाढ्य आणि प्रभावी उमेदवार म्हणून उदयास येत आहेत. राजकीय समीकरणांपेक्षा जनतेच्या विश्वासाच्या बळावर या जोडीने आपले स्थान मजबूत केले आहे.
“माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू – जिंकू किंवा मरू”, या जिद्दी पवित्र्यासह समीक्षा प्रणय मेश्राम निवडणुकीच्या मैदानात सज्ज झाल्या आहे. वेलतूर जिल्हा परिषद सर्कलमधील ही लढत चुरशीची आणि निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.







