सरकारी नोकरीच्या नावाखाली ३४.६० लाखांची फसवणूक करणाऱ्या माजी सैनिकाचा जामीन पुन्हा फेटाळला

तपास अधिकारी पोऊपणी स्वप्नील गोपाले यांचे सर्वत्र कौतुक
कुही : बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ३४ लाख ६० हजारांची फसवणूक करणाऱ्या माजी सैनिक पुरुषोत्तम बिलेवार या मुख्य आरोपीला न्यायालयाने पुन्हा एकदा जामीन नाकारत जोरदार झटका दिला आहे. कुही पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केल्यानंतर आरोपीने नव्याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र प्रकरणाचे गांभीर्य, जमा झालेल्या तांत्रिक पुराव्यांची ताकद आणि वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने बिलेवारचा अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला.

सरकारी सेवा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बिलेवारने रेल्वे, आर्मी, पोलीस भरतीसारख्या विभागांत नोकरी लावून देण्याची खोटी हमी दिली. स्वतःला निवृत्त सैनिक म्हणून सादर करत, वैद्यकीय चाचण्या आणि निवड प्रक्रिया तोच करून देऊ शकतो असा विश्वास बसवून ११ तरुणांकडून लाखो रुपये उकळण्यात आले. फिर्यादीने १५ सप्टेंबर २०२५ रोजी कुही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून भादंवि कलम ३१८(२), ३१८(४) भा.सं. २०२३ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. तक्रार दाखल होताच कुही पोलिसांनी पुख्ता तांत्रिक तपासानंतर शेगाव येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने बिलेवारला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान पैसे मोजण्याचे मशीन, संशयास्पद कागदपत्रे, तसेच भरतीशी संबंधित बनावट दस्तऐवज पोलिसांनी जप्त केले.
तपासात उघड झाले की बिलेवार ‘समर्थ करिअर अकॅडमी’ या यूट्यूब चॅनलद्वारे परीक्षार्थ्यांना लक्ष्य करत असे. सरकारी नोकरीची खात्री देणारे व्हिडिओ, जाहिराती प्रसारित करून तो विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकत असे. शिवाय, त्याच्या मालकीचे ‘बहीरम हंडी’ नावाचे हॉटेल शिर्डी रोडवर असल्याचेही निष्पन्न झाले. तपासादरम्यान काही युवक पुढे येऊन आपली फसवणूक झाल्याचे सांगण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण फसवणुकीची रक्कम ३४.६० लाखांपेक्षा अधिक असण्याची दाट शक्यता आहे. अटक झाल्यानंतर आरोपीचा पहिला जामिनाचा अर्ज नाकारला गेला होता. दोषारोपपत्र सादर केल्यानंतर दाखल केलेली दुसरी जामिनाची याचिकाही न्यायालयाने फेटाळली.
❖ तपास अधिकारी पोऊपणी स्वप्नील गोपाले यांचेवर कौतुकाचा वर्षाव
या प्रकरणात तपासाची जबाबदारी सांभाळणारे पोऊपणी स्वप्नील गोपाले यांनी अल्पावधीत प्रभावी तपास पूर्ण करत दोषारोपपत्र सादर केले. तांत्रिक पुरावे गोळा करणे, आरोपीचा शोध, झडती, जप्ती आणि तपासातील बारकावे यामुळे त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
❖ पोलिसांचे नागरिकांना आवाहन
सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांचं जाळं वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर ग्रामीण पोलिसांनी युवकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत संकेतस्थळांवरूनच भरतीसाठी अर्ज करावेत आणि कुणीही आमिष दाखवत असल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.







