नामजपानेच होते अंतःकरण शुद्ध : प्रवचनकार सुषमा बत्रा

नामजपानेच होते अंतःकरण शुद्ध : प्रवचनकार सुषमा बत्रा

मांढल : कलियुगातील धकाधकीच्या जीवनात मानसिक शांती आणि आत्मबळ मिळवण्यासाठी ‘नामजप’ हेच सर्वोत्तम साधन आहे. नामजपामुळे केवळ मन एकाग्र होत नाही, तर अंतःकरण शुद्ध होऊन व्यक्तीची सात्त्विकता वाढते, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवचनकार सुषमा बत्रा यांनी केले. त्या मांढळ येथील राममंदिर​ सभागृहात शुक्रवार,दि.९ जानेवारी ला सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘साधना प्रवचन’ या विषयावरील विशेष प्रवचनात त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांनी साधनेचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनात नामजपाचे होणारे सकारात्मक परिणाम यावर मार्गदर्शन केले. ​ सुषमा बत्रा म्हणाल्या की, जसे शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण स्नान करतो, तसेच मनावर साचलेले स्वभावदोष आणि अहंकाराचे मळ दूर करण्यासाठी नामजपाची आवश्यकता आहे. सातत्याने नामजप केल्याने मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाण कमी होऊन सकारात्मकता वाढते. ​ सध्याच्या काळात आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्या कुळदेवतेचा जप करणे आणि पूर्वजांच्या त्रासापासून रक्षणासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करणे कसे फलदायी आहे, याचे शास्त्रीय विश्लेषण त्यांनी यावेळी दिले. ​आजच्या धावपळीच्या युगात वाढता मानसिक ताण आणि नैराश्य यावर नामजप हे प्रभावी औषध आहे. दिवसातून जसा वेळ मिळेल तसा नामजप केल्याने मनाला स्थिरता लाभते. ​​केवळ माहिती घेऊन चालणार नाही, तर ती कृतीत आणणे म्हणजेच साधना होय.

प्रवचनाला स्थानिक नागरिकांचा विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेवटी अनेक जिज्ञासूंनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. ‘साधना केल्याने जीवनात आनंद कसा मिळवता येतो’, हे सुषमा बत्रा यांनी अतिशय सोप्या भाषेत मांडल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक डॉ. प्रेरणा लेंडे यांनी करून दिला. संचालन मेघा गवळी हिने केले तर आभार रेखा गोंदेवार यांनी मानले. यावेळी सरपंच सोनू निर्गुलकर, अनुराधा केळापूरे, शंकर बारई, मिलिंद दाणी, लीलाधर धनविजय, नथ्थुजी सेलोकर, राजीव बुद्धे आदी उपस्थित होते. ​