मुलाच्या डोळ्यांदेखत वडिलांना निर्घृणपणं संपवलं : इमामवाड्यातील थरार ; तिघांना अटक

मुलाच्या डोळ्यांदेखत वडिलांना निर्घृणपणं संपवलं : इमामवाड्यातील थरार ; तिघांना अटक

नागपूर : घरासमोर शिवीगाळ करीत असलेल्यांना हटकल्याने इसमाची त्याच्या मुलाच्या डोळ्यांदेखत हत्त्या करण्यात आली. ही घटना मध्यरात्री इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापला वस्ती येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मंगल भागीया कोरी (वय ५०, रा. कापला वस्ती, इमामवाडा) असे मृताचे नाव असून, रोहन चावरिया (वय ३४), रोहित चावरिया (वय ३२), कुंदन चव्हाण (वय ४९, सर्व रा. कापला वस्ती, इमामवाडा) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

प्राप्त माहिती माहितीनुसार, मंगल कोरी हे मजूर होते. रात्री ते घरी असताना, तिथे रोहन, रोहित आणि कुंदन तिघेही दारू पिऊन आले. मंगल यांच्या घरासमोर उभे राहून शिवीगाळ करू लागले. यावरून मंगल यांनी या तिघांना हटकले. यावरून मंगल यांचा कुंदनशी वाद झाला. दरम्यान, तिथे मंगल यांचा मुलगा शुभम आला. त्याने मध्यस्थी केली असता कुंदनने मंगल यांना झापड मारली. आपल्या वडिलांवर हात उचलल्याने शुभमने कुंदनच्या कानशिलात लगावली. यामुळे हा वाद वाढला. रोहनने शुभमला मारण्यासाठी घरातून लाकडी दांडा आणला.

त्याने तो शुभमला मारण्याचा प्रयत्न केला असता, वडील मंगल खाली वाकले. यामुळे दांडा त्यांच्या डोक्याला लागल्याने जबर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ही माहिती इमामवाडा पोलिसांना मिळताच, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत रोहन, रोहित आणि कुंदन या तिघांनाही तत्काळ अटक करण्यात आली.