सहा महिला वांरवार कारने अयोध्याला जायच्या, भाड्याने राहायच्या, मग एक दिवस अचानक…
नागपूर: कन्हान येथील पटेलनगरमधील सहा महिलांच्या एका टोळीला गोरखपूर पोलिसांनी अटक केली आहे. या महिला अयोध्या, मथुरा, गोरखपूर आणि वाराणसी येथील धार्मिक स्थळांवर जाऊन भाविकांची लूट करीत होत्या. ई-रिक्शामध्ये बसून चोरी करणे आणि ऑटोमधून पळून जाणे ही त्यांची पद्धत होती.
नागपूरच्या कन्हान येथील पटेलनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या पटेलनगरच्या सहा महिला वारंवार अयोध्या, मथुरा, गोरखपूर आणि वाराणासीला जात होत्या. या महिला कारने सुमारे 800 किलोमीटरचा प्रवास करून जायच्या. आता तर या महिला अयोध्येत सहा महिने राहिल्या. त्यानंतर गोरखनाथ मंदिर मेळ्यासाठी गोरखपूरला गेल्या. कँट पोलिसांनी या सहा महिलांना अटक केली. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली. त्यावेळी जे कळलं त्याने पोलीसही हादरून गेले.

लोकांची फसवणूक करून त्यांचे सोनेचांदी लुटणाऱ्या सोनेरी टोळीच्या सात सदस्यांना गोरखपूरच्या कँट पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचला आणि ही टोळी जेरबंद केली. या गँगचे सदस्य देशातील प्रमुख धर्मस्थळांच्या ठिकाणी जायचे. तिथे जाऊन चोरी करायचे. या टोळीत सहा महिला होत्या. या सर्व महिला नागपूरच्या कन्हानमधील पटेलनगरमधील राहणाऱ्या आहेत.
सरदार ढाब्याजवळच पकडले
गोरखपूरच्या खिचडी मेळ्यात चोरी करण्यासाठी ही टोळी शहरात आली होती. गोरखनाथ मंदिरात खिचडी मेळ्याचं आयोजन होतं. या ठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. त्यामुळे भाविकांची लूट करायची हा या टोळीचा उद्देश होता. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा उद्देश धुळीला मिळाला आहे. या आरोपींकडून पोलिसांनी 26 हजार रुपये जप्त केले आहेत. सोन्याच्या बांगड्या, एक कारही पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी या सर्वांना सरदार ढाब्याजवळून अटक केली आहे.
ई-रिक्षातून गेम
आपण यापूर्वीही गोरखपूरला येऊन गेल्याचं या महिलांनी कबूल केलं आहे. 19 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी गोलघर परिसरात ई-रिक्शाने घरी जाणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून सोन्याची चेन खेचल्याचं या महिलांनी सांगितलं. या टोळीतील महिला ई-रिक्शात बसायच्या. त्याचवेळी त्या चोरी करून पसार व्हायच्या. त्यांचे साथी गाडी घेऊन पाठीपाठी यायचे. अन् गाडीत बसून सुस्साट वेगाने पळून जायचे. आम्ही धार्मिक स्थळांवर येणाऱ्या भाविकांनाच टार्गेट करायचो असं या महिलांनी सांगितलं. अयोध्या, चित्रकूट, वाराणसी, प्रयागराज आणि मथुरासारख्या शहरात कितीतरी वेळा चोरी केल्याचं या महिलांनी सांगितलं.
त्या आल्याचं कळलं अन्…
या महिलांनी सहा महिने अयोध्येत भाड्याने राहिल्याचं सांगितलं. यावेळी अनेकवेळा चोरी केल्याचंही या महिलांनी स्पष्ट केलं. या टोळीचे सदस्य अयोध्येतून गोरखपूरला आले होते. एसपी सिटी अभिनव त्यागी यांनी याबाबतची माहिती दिली. धनत्रयोदशीच्या दिवशी एका महिलेची सोनसाखळी चोरल्याची घटना घडल्यानंतर आम्ही या टोळीच्या मागावर होतो. त्यांची माहिती गोळा करत होतो. ही टोळी परत एकदा शहरात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही खबर मिळताच सापळा रचला आणि या टोळीच्या सहा महिलांना अटक करण्यात यशस्वी झालो. या महिला ई-रिक्शा आणि ऑटोमध्ये बसलेल्या महिला प्रवाश्यांशी गोड बोलून त्यांची लूट करायच्या, असं त्यागी म्हणाले.


