बारावीच्या विद्यार्थ्याचा बहिणीच्या मैत्रिणीवर दोघांसह आळीपाळीने अत्याचार ; आरोपीच्या पित्याला समजताच हार्ट अटॅक
नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीच्या मुलाने आणि त्याच्या दोन मित्रांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी एका तरुणाला अटक केली आहे. तर दोन मुलं ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी हा स्वतः अल्पवयीन असून तो बारावीचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी ही मुख्य आरोपीच्या बहिणीची मैत्रीण होती. याच ओळखीचा फायदा घेत आरोपीने तिला अनेकदा भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र, पीडितेने त्याला वारंवार नकार दिला. असे असतानाही आरोपीने तिला मेसेज करणे सुरूच ठेवले. अखेर ४ फेब्रुवारी रोजी आरोपीने पीडितेशी संवाद साधून तिला आपल्या घरी बोलावले. पीडित मुलगी जेव्हा आरोपीच्या घरी पोहोचली, तेव्हा तिथे आरोपी आणि त्याचे दोन मित्र आधीच उपस्थित होते. मुख्य आरोपीने मुलीला एका खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, हे कृत्य घडत असताना बाहेर असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला.

यानंतर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत इतर दोन आरोपींनीही पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपींनी पुन्हा एकदा पीडितेला तो व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि तिला पुन्हा भेटायला बोलावले. मात्र, या जाचाला कंटाळून आणि प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडितेने अखेर धाडस दाखवून आपल्या कुटुंबाला आपबिती सांगितली. त्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पोक्सो (POCSO) कायद्या अंतर्गत आणि बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेचे पडसाद आरोपींच्या कुटुंबावरही उमटले आहेत. मुख्य आरोपी हा बारावीचा विद्यार्थी असून, मंगळवारी त्याचा पहिला पेपर होता. मात्र, पोलीस कोठडीत असल्याने त्याला परीक्षा देता आली नाही. आपल्या मुलाने अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य केल्याचे समजताच आरोपीच्या वडिलांना धक्का बसला असून त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले असून, अत्याचार करतानाचा व्हिडिओ खरोखर काढला होता का आणि तो कुठे शेअर केला आहे का ? याचा तांत्रिक तपास सध्या सुरू आहे.







