उपचाराच्या नावाखाली नवजात बालिकेला डॉक्टरने अडीच लाखात विकले ; पाच जणांवर गुन्हे दाखल
भंडारा: स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने १० दिवसाच्या नवजात बालिकेला उपचारासाठी नागपूरला पाठवतो सांगून तिची तिऱ्हाईत व्यक्तीला अडीच लाख रुपयात विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार गोंदिया येथील एक डॉक्टर असून त्याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आतापर्यंत केवळ एकाच व्यक्तीला अटक झाली आहे. मुख्य सूत्रधार असलेला डॉ. नितेश बाजपेयी फरार असल्याने पोलीस त्याच्या शोध घेत आहेत.
मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी येथील मालती प्रकाश वाघमारे या महिलेच्या घरी दहा दिवसाची नवजात बालिका असल्याची माहिती महिला व बालकल्याण विकास विभागाच्या चाइल्ड हेल्पलाइन वर अज्ञात व्यक्तीने दिली. हेल्पलाइन समन्वयक त्यांच्या घरी पोहोचल्या असता तेथे त्यांना बालिका आढळून आली. गोंदिया येथून मुलीला आणले, असे मालती हिने पथकाला सांगितले. दरम्यान अधिक चौकशीसाठी मालती वाघमारे हिला भंडारा येथे महिला बालकल्याण विभागात बोलविण्यात आले होते. मात्र ती उपस्थित झाली नाही. त्यामुळे चाईल्ड हेल्पलाइनच्या समन्वयीकांच्या वतीने संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस ठाण्यातील पथक ताबडतोब वाघमारे यांच्या घरी पांढराबोडीला पोहोचले मात्र, महिला बालिकेला घेऊन चारचाकीने निघून गेल्याचे समजताच पोलिसांनी नाकाबंदी करत ताब्यात घेतले. गोंदिया येथील एका डॉक्टरांच्या सांगण्यावरून आपण मुलीला गोंदियाला घेऊन जात असल्याचे सांगितले.

पोलिसांनी ताबडतोब परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनेची नोंद वरठी पोलीस ठाण्यात केली. दरम्यान बालिकेच्या खऱ्या आई वडिलांनी बालकल्याण समिती पुढे येऊन जे काही सांगितले त्यावरून बाळ विक्रीचा प्रकार उघड झाला. झालेली मुलगी तिसरे अपत्य होते. वेळेच्या आधीच जन्मास आल्याने, बाळाची तबेत बरी नव्हती. त्यामुळे गोंदिया येथील डॉ. नितेश बाजपेयी यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले. उपचार करण्याइतपत पैसे नसल्याने एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून नागपूर येथे बाळाला उपचारासाठी पाठवतो असेल डॉक्टरांनी सांगितल्याचे आई-वडिलांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात डॉक्टरांनी मुलीला उपचारासाठी नागपूरला न पाठवता त्यांची हस्तक असलेल्या ललेश्वरी सादेपाच गोंदिया येथील महिलेच्या मदतीने बाळाला मालती वाघमारे हिला विकले. यासाठी मालती हिने ललेश्वरी हिच्या खात्यात सौद्यातील अडीच लाखापैकी एका लाख धनादेशाद्वारे आणि उर्वरित रक्कम नगदी दिल्याचे समजते. यातील मुल चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर वरठी पोलीस ठाण्यात डॉ. नितेश बाजपेयी, ललेश्वरी सादेपाच, मालती वाघमारे, पौर्णिमा धुर्वे, उमेश सिंग गहलोत यांच्या विरोधात कलम 143 (4) 317 (2), 3 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील प्रकरणातील ललेश्वरी सादेपाच हिला अटक करण्यात आली असून डॉक्टर व त्याचे सहकारी फरार असल्याचे समजते. उघडकीस आलेले प्रकरण अत्यंत घृणास्पद आणि वैद्यकीय पेशाला काळिमा फसणारे आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला असलेला डॉ. बाजपेयी हा फरार असून त्याच्या शोधात दोन पथके रवाना झाली. डॉक्टरांच्या डिग्री विषयी साशंकता आहे. यापूर्वीही असा प्रकार झाल्याचे समजते. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि विविध अंगाने तपास करून वास्तव व बाहेर आणू, अशी प्रतिक्रिया या प्रकरणाचे तपास अधिकारी यांनी दिली.







