उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यात “एफ-२” वाघिणीचा बछड्यांसह वावर
उमरेड: उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला खरी ओळख मिळवून दिली ती ‘जय’ या वाघाने. नागझिरा अभयारण्यातून नैसर्गिक स्थलांतर करुन आलेला हा वाघ कधी राष्ट्रीय महामार्गावर, कधी नद्या ओलांडणाऱ्या ‘जय’ ला पाहण्यासाठी सामान्य पर्यटकांपासून तर ‘सेलिब्रिटी’ अशी सर्वांचीच गर्दी असायची. मात्र, ‘जय’ गेला आणि पर्यटकांनी या अभयारण्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर ‘फेअरी’ ही वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांनी पर्यटकांना आकर्षित केले.
उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव गेट जवळ सध्या एक वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. “एफ-२” नावाच्या या वाघिणीसह तिच्या पाच बछड्यांचे उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांना दर्शन होत असल्याने पर्यटक सुखावले आहेत. “एफ-२” वाघीण ही “फेअरी” वाघिणीची मुलगी आहे. “एन-४” आणि “पाटील” नावाच्या दोन वाघासोबत तिचा वावर होता.

सध्या या परिसरात “जे-मार्क” नावाच्या वाघाचा दबदबा आहे. नागपूरच नाही तर अवघ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील वन्यजीवप्रेमी पर्यटकांची पावले नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडलाच्या जंगलाकडे वळली आहेत. या जंगलात वाघाचेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे हमखास दर्शन पर्यटकांना होत आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या देखील वाढीस लागली आहे.


