धक्कादायक! सायबर गुन्हेगारांनी चक्क न्यायाधीशांनाच घातला गंडा
नागपूर : सध्या राज्यात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारांची हिम्मत वाढली असून सामान्य नागरिकांपासून चक्क न्यायधीशांपर्यंत सायबर गुन्हेगाराच्या टार्गेटवर आहेत. नागपुरात असाच एक प्रकार उघडकीस आला असून सायबर गुन्हेगारांनी चक्क एका न्यायाधीशांनाच गंडवले आहे. त्या न्यायधीशांची १३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केली असून या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका जवळच्या नातेवाइकाच्या माध्यमातून त्यांना फाल्कन इन्व्हॉईस डिस्काउंट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मबाबत माहिती कळाली. त्यामुळे न्यायाधीशांनी देखील गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून सुरुवातीला २४ हजार रुपये गुंतविले. कंपनीने ४८ दिवसांनंतर त्यांना २४ हजार रुपये मुद्दल आणि नफ्याची अतिरिक्त रक्कम बँक खात्यात परत केले. त्यामुळे न्यायाधीशांचा फाल्कन प्लॅटफॉर्मबाबत विश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी फाल्कनच्या त्यांच्या खात्यातून विविध कंपन्यांच्या इन्व्हॉईसमध्ये १३ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली.

३ फेब्रुवारी रोजी त्यांनी हैदराबाद येथील लाइफस्टाइलच्या इन्व्हॉईसमध्ये एक लाख रुपये गुंतविले. परंतु फाल्कनच्या खात्यात डील रक्कम जमा झालीच नाही. त्यांनी फाल्कनशी संपर्क केला असता कुणीच फोन उचलला नाही. हेल्पलाइनवरदेखील काहीच प्रतिसाद मिळाला नाही. न्यायाधीशांनी त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क केला असता त्यांचे फोन देखील कुणीच उचलत नव्हते. आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच न्यायाधीशांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फाल्कन इन्व्हॉईस डिस्काउंटचा संचालक अमरदीप कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


