युनिसेक्स सलून; ‘स्पा-मसाज’ सेन्टरमध्ये तरुणी, ‘नको त्या अवस्थेत’, दोघे अटकेत 

युनिसेक्स सलून; ‘स्पा-मसाज’ सेन्टरमध्ये तरुणी, ‘नको त्या अवस्थेत’, दोघे अटकेत 

नागपूर : प्रतापनगरातील पन्नासे लेआऊटमधील श्री गणेशा अपार्टमेंटमध्ये एक्झेल युनिसेक्स सलून सुरु करण्यात आले. काही दिवसांतच या सलूनमध्ये आंबटशौकीन ग्राहकांची गर्दी वाढायला लागली. स्पा आणि मसाज करण्याच्या नावावर तेथे काम करणाऱ्या तरुणी आंबटशौकीनांसोबत शरीरविक्रय करीत होत्या. गुन्हे शाखेने येथे छापा घातला असता दोन तरुणी ग्राहकांसोबत ‘नको त्या अवस्थेत’ आढळून आल्या.

पोलिसांनी दोन्ही तरुणींना ताब्यात घेतले असून दोघांना अटक केली आहे. भरत प्यारेलाल कश्यप (३५, रा. व्यंकटेशनगर, खामला), संजय उमाजी आष्टीकर (रा. तकिया, धंतोली) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पथक प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी संध्याकाळी गस्तीवर होते. यावेळी, खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी श्री गणेश अपार्टमेंट, पन्नासे ले-आऊट, सावरकर चौकात असलेल्या एक्झेल युनिसेक्स सलूनमध्ये छापा टाकला. येथे आरोपी भरत कश्यप आणि संजय आष्टीकर हे दोघे स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता देहव्यवसाय चालवत असताना सापडले.

आरोपी पीडित तरुणींना पैशांचे आमिष दाखवत देहव्यवसायाच्या जाळ्यात ओढायचे आणि त्यांना ग्राहक आणि व्यवसायासाठी जागा पुरवायचे. कारवाईत पोलिसांनी दोन पीडित युवतींची सुटका केली. तर, आरोपींच्या ताब्यातून २ भ्रमणध्वणी, १९ हजार ६०० रुपयांची रोकड व अन्य साहित्य असा एकूण ७५ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर आरोपीविरूध्द कलम ३, ४, ५, ७ अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनीयमान्वये गुन्हा दाखल केला. जप्त मुद्देमालासह आरोपींना प्रतापनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.