पैशाचा वाद जीवावर बेतला ; लेकीच्या घरी आलेल्या बापाला जावयाने निर्घृणपणे संपवलं
नागपूर : पैशाच्या वादातून जावयाने वरवंट्याने डोके ठेचून झोपेत असलेल्या सासऱ्याची हत्या केली. ही थरारक घटना सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बहादुरा परिसरात घडली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी जावयाला अटक केली.
जनार्दन बिसन दमके (वय ६५, रा. कळमना, शिरसी, ता. उमरेड), असे मृतकाचे तर, गौतम केशवराव फुलझेले (वय ४०, रा. जुनीवस्ती, बहादुरा), असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. गौतम हा पारले-जी कंपनीत काम करायचा. काही महिन्यांपूर्वी त्याची नोकरी सुटली. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडली. स्वाती या खासगी काम करून दोन अपत्ये व पतीचे पालनपोषण करतात. जनार्दन यांनी मुलीकडून पैसे उधार घेतले. ते स्वाती यांना पैसे परत करू शकले नाहीत. त्यामुळे गौतम हा संतापला होता. ५ मे रोजी जनार्दन पत्नीसह नातेवाइकाच्या लग्नाला बहादुरा येथे गेले. रात्री ते स्वातीकडे थांबले.

मध्यरात्री जनार्दन हे झोपले होते. ते झोपेत असतानाच गौतमने वरवंट्याने त्यांचे डोके ठेचले. सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जखमी जनार्दन यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून गौतमला अटक केली.

