लष्करी गणवेश घालून डॉक्टरला फसवलं ; निसर्गोपचारच्या नावावर दीड लाखाचा गंडा
नागपूर : जवळपास दीडशे सैनिकांवर निसर्गोपचार आणि त्याचे प्रशिक्षण द्यायचे आहे असे सांगून शहरातील ज्येष्ठ निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. धनलाल शेंदरे यांना तब्बल १ लाख ६० हजार रुपयांनी गंडविण्यात आले.
डॉ. शेंदरे यांना दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने मोबाइलवर संपर्क साधला. ‘मी कामठी येथील लष्करी छावणीतून बोलत आहे. आमच्या दीडशे सैनिकांना निसर्गोपचार आणि प्रशिक्षण घ्यायचे आहे. त्यामुळे त्याची प्रक्रिया सांगा’, अशी विनंती केली. रात्री पुन्हा त्याच व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला व ‘या उपचारांना किती खर्च येईल ते सांगा, आमचे लष्कराचे काम आहे. आधी आम्हाला खर्च मंजूर करून घ्यावा लागतो. त्यामुळे पैसे सांगा’, असा आग्रह धरला. तसेच ‘तुमच्या मोबाइलवर मी १० रुपये पाठवित आहे, ते आले का कळवा म्हणजे मला याच क्रमांकावर बाकीचे पैसे पाठविता येतील’, असेही त्याने सांगितले. तोवर शेंदरे यांच्या खात्यात १० रुपये जमा झाल्याचा संदेश आला होता. त्यामुळे त्यांनी पैसे आल्याचे सांगताच, ‘आता तुम्ही तुमच्या खात्यात जी शिल्लक आहे, त्याचा स्क्रीन शॉट काढून घ्या म्हणजे आम्ही किती पैसे टाकले हे लक्षात येईल’, असे म्हटल्याने डॉ. शेंदरे यांनी मोबाइलवरच खाते उघडून शिल्लक रकमेचा स्क्रीन शॉट काढून घेतला. मात्र, दहा मिनिटांनी त्यांना आपल्या खात्यातून आधी ७९,९०० व नंतर ८० हजार रुपये काढण्यात आल्याचे लक्षात आले.

डॉ. शेंदरे यांनी लगेच त्या व्यक्तीला फोन केला. त्यावर ‘मी अजून पैसे टाकलेले नाहीत, तुमचा काहीतरी घोळ झालेला आहे, असे सांगताच डॉ. शेंदरे यांनी फोन बंद केला. त्यांनी रात्रीच सायबर ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या प्रकरणाचा त्वरित तपास करून पैसे परत मिळवून द्यावे, अशी मागणी डॉ. शेंदरे यांनी केली आहे. फोन करणाऱ्यांने व्हिडीओ कॉल करताना लष्करी गणवेश घातला होता. तसेच त्याच्याकडे लष्कराचे ओळखपत्रही होते. त्यामुळे हा लष्करी अधिकारी आहे, यावर डॉ. धनलाल शेंदरे यांचा विश्वास बसला आणि त्यांना दीड लाख रुपयांचा गंडा घातला गेला.

