जीवनापूर पुनर्वसन भागात चराईदरम्यान विषबाधा झाल्याचा संशय ; ७ शेळ्या व ३ बकऱ्यांचा मृत्यू
लाखोंचे नुकसान; पशुवैद्यकीय विभागाची तातडीची धाव
कुही : जीवनापूर पुनर्वसन परिसरात गुरुवारी (दि. ११ डिसेंबर) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत ७ शेळ्या व ३ बकऱ्यांचा संशयित विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. भिमराव मुळेकर (रा. पचखेडी) हे नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावातील व स्वतःच्या बकऱ्या चरायला घेऊन जीवनापूर पुनर्वसन भागात गेले होते. मात्र काही वेळातच कळपातील काही शेळ्या व बकऱ्या अचानक खाली कोसळू लागल्या. शेतकऱ्यांनी तातडीने गावकऱ्यांना माहिती दिली. घटनास्थळी धाव घेतली तेव्हा तब्बल ९ बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेत मनोहर मुळे – ४ शेळ्या, भीमराव मुळे – २ शेळ्या, सुधाकर खांबडकर – १ शेळी, सुनील चौधरी – १ शेळी असा एकून ९ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार चराईदरम्यान अज्ञात विषारी पदार्थाचे सेवन झाल्याने ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी मृत शेळ्या–बकऱ्यांची उत्तरीय तपासणी केली असून सॅम्पल पुढील चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. याशिवाय ३ शेळ्या गंभीर आजारी असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. कळपातील उर्वरित जनावरांचे सुरक्षाकरिता लसीकरणही करण्यात आले आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्यांना सरासरी एक लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. परिसरातील नागरिकांनी या घटना पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने तपास करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.







