कुही – आंभोरा मुख्य मार्गावरील कल्पना जिनिंगला भीषण आग ; करोडोंचे नुकसान
कुही : कुही–आंभोरा मुख्य मार्गावरील भंडारबोडी शिवारात असलेल्या कल्पना जिनिंग येथे गुरुवारी दि. 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजताच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली. या आगीत जिनिंग परिसरात साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील कापूस जळून खाक झाला असून करोडोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान, उशिरापर्यंत कापूस जळतच असल्याची माहिती समोर येत आहे.
आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत एक लहान मुलगा भाजल्याची माहिती समोर आली असून त्याला तातडीने नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मौदा व उमरेड येथील अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून इलेक्ट्रिक स्पार्कमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच कुहीचे तहसीलदार अमित घाडगे, नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे सह पोलीस यंत्रणेने घटनास्थळी भेट दिली.







