दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली; काय म्हणाले शिक्षण मंडळ? 

दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली; काय म्हणाले शिक्षण मंडळ? 

राज्यात परीक्षांचे वातावरण आहे, दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परिक्षा सुरु आहेत. पुढील आठवड्यामध्ये या दोन्ही परीक्षा संपणार आहेत. अशामध्ये झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे कामही सुरु झाले आहे. अशातच विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार? हा प्रश्न पडला आहे. यावर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने निर्णय दिला आहे. HSC तसेच SSC चा निकाल लवकरच लागणार आहे. १५ मे २०२५ या तारखेच्या पूर्वी निकाल सादर करण्यात येणार आहे.

यंदाच्या बोर्डाच्या परीक्षा वेळेच्या अगोदर घेण्यात आल्या होत्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरवर्षीच्या वेळेनुसार किमान १० दिवसांआधी घेण्यात आल्या, त्यामुळे याचा परिणाम निकालावर होणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात निकाल लागतो. पण आता निकाल १५ मे पूर्वी लागणार असल्याने विद्यार्थ्यांना जास्त वाट पहावी लागणार नाही. लवकर परीक्षा घेण्यात आल्याने निकालही लवकर जाहीर होईल, असा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. तसेच पुरवणी परीक्षाही जुलै महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या निकलाबाबत भाष्य केले आहे. त्यांचे असे मत आहे की, राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा अगदी सुरळीत सुरु आहेत. त्याचबरोबर उत्तरपत्रिका तपासणीचे कार्यही प्रगतीपथावर आहे. या वर्षी बोर्डाच्या परीक्षा वेळेआधीच आयोजित करण्यात आल्या होत्या, म्हणून बोर्डांच्या पेपरचा निकालही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी राज्य शिक्षण मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला होता. परीक्षा केंद्रावर त्या शाळेचे शिक्षक न ठेवता, इतर केंद्राहून पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण ३१ लाख विद्यार्थी यंदाच्या परीक्षेत बसले होते. कर्मचारी ही इतर केंद्रावरून मागवण्यात आले होते.