धाकट्या भावाने आईसमोरच विळ्याने चिरला थोरल्या भावाचा गळा

धाकट्या भावाने आईसमोरच विळ्याने चिरला थोरल्या भावाचा गळा

नागपूर : मोठ्या भावाने उशिरा येण्याचे कारण विचारले असता लहान भावाने त्याला उलटसुलट उत्तर देत टाळाटाळ केली. त्यामुळे भावाने रागावले आणि पटकन जेवन करुन झोपण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या भावाने मोठ्या भावाशी वाद घातला आणि घरातून विळा आणून आईसमोरच त्याचा गळा चिरला. पोटचा मुलगा क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्यामुळे आईने हंबरडा फोडला आणि मदतीसाठी शेजाऱ्यांनी धाव घेतली. पोटच्या तरुण मुलाचा आईच्या डोळ्यासमोरच श्वास थांबला. ही थरारक घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री घडली.

राजू कुंभलाल यादव (३०) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून मुलगा विजय यादव (२३) याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुलशननगर येथील रहिवासी रमा यादव (६०) यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. मुलगी शेजारीच राहाते. राजू हा मजुरी करायचा तर राजेश कळमना बाजारात मिरची व्यापाऱ्याकडे काम करतो. विजय हा वस्तीत फिरून टवाळक्या करतो. रात्री सर्वजन घरी होते. त्याच वेळी विजय घरी आला. राजूने त्याला जेवन करून घे, असे म्हटले. यावरून त्याने राजूला शिवीगाळ केली. मोठ मोठ्याने ओरडून तो शिवीगाळ करीत होता. वाद विकोपाला जाताच विजयने स्वयंपाक घरातून विळा आणला आणि राजूच्या छाती आणि डोक्यावर वार करून त्याला रक्तबंबाळ केले.जखमी अवस्थेत राजूला मेयो रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी  मृत घोषित केले.

माहिती मिळताच कळमना पोलिसांचे पथक मेयो रूग्णालयात पोहोचले. कुटुंबीयांचे जबाब नोंदवून तक्रारीवरून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला. काही वेळातच आरोपी विजयला अटक केली. त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. रमा या धाय मोकलून रडत होत्या. त्यांचा मोठा मुलगा मृत पावला तर लहान मुलगा कारागृहात जाणार होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.