मद्यधुंद पोलिसाची मेडिकलमधील सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
नागपूर : मेडिकलमधील नेत्र विभागाच्या ओपीडी समोर सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सिव्हिल पोशाखात दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामध्ये जोरात गाणे वाजवून धिंगाणा घालणाऱ्या पोलिसाने चक्क मेडिकलमधील महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला गंभीर मारहाणही केली. मध्यरात्री वॉर्ड क्रमांक 47 च्या खाली हा गंभीर प्रकार घडला.
मद्य प्राशन केलेला हा पोलिस स्वतःला शहराच्या सहपोलिस आयुक्तांचा ड्रायव्हर असल्याचे सांगत होता. मध्यस्थीसाठी आलेल्या जवानांनी त्याला रोखल्याने पुढील दुर्घटना टळली. यात आणखी संतापजनक बाब म्हणजे या प्रकाराची अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करूनही पोलिसांनी रात्रीपर्यंत त्याची कसलीही गंभीर दखल घेतली नाही, की गुन्हा दाखल केला की नाही याची देखील माहिती दिली नाही.

या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जवानाच्या डोक्यात खोच पडली आहे. शुभम गायधनी असे पोलिसाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एमएसएफ जवानाचे नाव आहे. त्याच्या डोक्याला खोच पडल्याने तीन टाके घालण्यात आले आहेत.


