फेरफार दुरुस्तीसाठी ४५०० रुपयांची लाच मागणारी तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात ; कुही तालुक्यात होती कार्यरत
कुही :- शेतकऱ्याच्या सातबारा वरील फेरफार क्रमांक चुकीने दुसरा दर्शवण्यात आला असल्याने फेरफार दुरुस्त करून सातबारा देण्यासाठी तडजोडी अंती ४५०० रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या ससेगाव येथील महिला तलाठी यांच्यावर लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्र. विभागाने तिला तिच्या राहते घरी रंगेहात पकडल्याची माहिती आहे.
तालुक्यातील मौजा ससेगाव येथे एका शेतकऱ्याची साडेसहा एकर शेती शेती असून त्यांचे सातबारा उताऱ्यावर फेरफार क्रमांक चुकीने दुसरा दर्शविण्यात आला होता. त्यामुळे त्या संबंधाने संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात दुरुस्ती अर्ज दाखल करून त्याबाबतचा प्रकरणाची शहानिशा करत नायब तहसीलदार यांचा फेरफार दुरुस्ती आदेश घेण्यात आला होता. मात्र ससेगाव साझ्याच्या तलाठी प्रज्ञा माटे यांनी शेतकऱ्याला फेरफार दुरुस्ती करण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेवटी तडजोडी अंती शेतकऱ्याने ४५०० देण्याचे काबुल केले. मात्र संबंधीत शेतकऱ्याला लाच द्यायची नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागासोबत संपर्क साधला. ठरल्याप्रमाणे काल दि. १२ एप्रिलला नागपूर येथील तिचा राहते घरी शेतकऱ्याकडून लाचेची ४००० रुपयांची रक्कम स्वीकारल्यावर आरोपी तलाठी प्रज्ञा दयाराम माटे (वय-३४), रा. शांतीनगर नागपूर हिला रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, सचिन कदम अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनात ला.प्र.विभागाचे पोलीस निरीक्षक शिवशंकर खेडेकर सह नापोशी हरीश गांजरे, नापोशी सचिन किनेकर, पोशी विकेश राऊत, मपोशी स्वाती हिंडोरिया, महिला वाहन चालक प्रिया नेवारे यांच्या पथकाने केली आहे.


