अवैध मुरूम वाहतुकीचा ट्रक पकडला ; कुही पोलिसांची कारवाई

अवैध मुरूम वाहतुकीचा ट्रक पकडला

 कुही पोलिसांची कारवाई

 कुही:- स्थानिक पोलिसांतर्फे कुही पोलीस स्टेशन अंतर्गत खापरी फाटा येथे नाकाबंदी दरम्यान अवैध मुरूम वाहतुकीचा ट्रक पकडला असून आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक देविदास ठमके आपल्या चमु सह  गुरुवारी (दि. 11 जुलै) सायंकाळी ७  ते ११ च्या दरम्यान नाकाबंदी करत असताना एक बिना  क्रमांकाचा टिप्पर  येताना दिसून आला. लागलीच टिप्परला हात दाखवून थांबवत चौकशी केली असता टिप्परमध्ये मुरूम असल्याचे कळले. पोलिसांनी पंचांना बोलवून पंचांसमक्ष चालकाला नाव व मुरुमाची रॉयल्टी  मागितली असता चालकाने  निखिल राजहंस बनकर (वय 20) रा. आनंदवन, सुरगांव असे स्वताचे नाव सांगत मुरुमाची  रॉयल्टी नसल्याचे सांगितले. पोलिसांनी टिप्परची पाहणी केली असता टिप्पर मध्ये 6  ब्रास मुरूम दिसून आले. व सदर मुरूम कोठून आणले याची विचारणा केली असता सदर मुरूम  पारडगाव खदान येथून आणल्याचे चालकाने  सांगितले. कुही पोलिसांनी मुरुमाचा विना क्रमांकाचा 10 चाकी टिप्पर त्याचे चेचेस नं. नमूद करून 10 चाकी टिप्पर ची अंदाजे किंमत  २५,००,००० व ६  ब्रास मुरूम अंदाजे १०,००० रुपये असा २५,१०,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.  टिप्पर  मालक अश्विन ठाकरे रा. पांढरकवडा, जि. नागपूर यांचे सांगण्यावरून चालकाने विनापरवाना मुरूम आणल्याने चालक व मालक  अश्या  दोन्ही आरोपींविरुद्ध विरूध्द कलम ३०३ (२), ४९ भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ४८(७),४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ सहकलम ४, २१ खाणी आणि खनिजे (विकास आणि नियमन) अधिनियम १९५७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याचा अधिक तपास ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पोउपनि देविदास ठमके करत आहेत.