कुही तालुक्यात रस्त्यांची दयनीय अवस्था ,खड्ड्यांनी गिळला विकासाचा रस्ता
मृत्यू महामार्गावरून दररोज हजारो नागरिकांचा प्रवास; प्रशासन गप्प, लोक संतप्त
स्वप्नील खानोरकर

कुही : तालुक्यातील रस्ते म्हणजे अक्षरशः मृत्यूचे आमंत्रण. कुठे खड्डा टाळायचा, कुठे जीव वाचवायचा हा प्रवास रोजचा झाला आहे. आवरमारा–राजोला–साळवा, पचखेडी–परसोडी–दहेगाव, पचखेडी–सावंगी–फेगड, कुही–भटरा–लोहारा–अडम–मांढळ.अशा असंख्य मार्गांची अवस्था इतकी बिकट की रस्ता हा शब्द वापरणं सुद्धा नागरिकांना चेष्टेसारखं वाटू लागलं आहे. तालुक्यातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांवर आज खड्ड्यांचा कब्जा आहे. काही ठिकाणी रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच ओळखता येत नाही. १५–२० वर्षांपूर्वी झालेलं काम आजही डागडुगीच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळा सुरू होताच चिखल, पाणी, आणि खड्ड्यांमध्ये बुडालेली वाहनं हा नेहमीचा प्रकार.काही मार्ग तर अपघातांसाठी कुप्रसिद्ध झाले आहेत. सरळसोट रस्ता, पण गतिरोधक नाहीत, वळणांवर इशारे नाहीत. परिणामी भरधाव वेगाने जाणारी वाहने आणि एका चुकीत जीव गमावणारे प्रवासी. अशा रस्त्यावर अनेकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे रुग्णवाहिका खड्ड्यांत अडकून उपचारांत विलंब होतो. शाळकरी मुलांना चिखलातून चालत जावं लागतं, बस चालकांचे हाल होतात, दुचाकी वाहनधारकांचे संतुलन बिघडते आणि अत्यावश्यक सेवांचा खर्च वाढतो. पावसाळ्यात खड्ड्यांतील पाणी तळी बनतं. विकास मेळावे, जाहिराती, आणि आश्वासनांचा पाऊस पण प्रत्यक्षात ग्रामविकास फक्त कागदावरच. लोकप्रतिनिधी निवडणुकीपूर्वी भरघोस वादे करतात, पण निवडून आल्यावर गावच्या रस्त्याकडे तोंडही करत नाहीत. नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद नाही, अधिकारी फिरकत नाहीत आणि रस्त्यांचे काम मात्र होत नाही.
तालुक्यातील खराब झालेल्या मार्गांचे तातडीने नूतनीकरण, गतिरोधक बसवणे, आणि सुरक्षितता उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.


