भोरदेवमध्ये बिबट्याचा चरणाऱ्या  गायीवर हल्ला, गाय ठार , जंगलाच्या काठावर वन्यप्राण्यांचा उच्छाद ; ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे वनविभागाचे  आव्हान.

 भोरदेवमध्ये बिबट्याचा चरणाऱ्या  गायीवर हल्ला, गाय ठार ;जंगलाच्या काठावर वन्यप्राण्यांचा उच्छाद

ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे वनविभागाचे  आव्हान.

स्वप्नील खानोरकर 

कुही :- तालुक्यातील भोरदेव शेतशिवारात बुधवार १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान चारण्यासाठी गेलेल्या सोमेश्वर आस्वले यांच्या गायीवर बिबट्याने अचानक हल्ला चढवून ती ठार मारली. या घटनेने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

माहितीनुसार नेहमीप्रमाणे आस्वले यांचे जनावर मौजा भोरदेव शेतशिवारात चारण्यासाठी नेण्यात आली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास झुडपांच्या आडून दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली. काही क्षणातच गायीला जमिनीवर पाडत तिचा जीव घेतला.घटनेची माहिती मिळताच कुही वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक ओ. बी. चौरागडे, खोबना बीट वनरक्षक एन. एस. पिपरे व सहकारी आर. एम. मुंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृत जनावराची पाहणी करून मौकापंचनामा केला. यावेळी ग्रामपंचायत अंबाडीचे सरपंच योगेश गोरले, सदस्य ईश्वर निनावे, गायमालक सोमेश्वर आस्वले तसेच ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते. पाहणीदरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, या परिसरात वाघ आणि बिबट्यांचे वास्तव्य निश्चित आहे. त्यामुळे जंगलाला लागून असलेल्या शेतांमध्ये जनावरे नेणे टाळावे. शेतकरी व जनावरपालकांनी विशेष सतर्क राहावे, तसेच हल्ला टाळण्यासाठी गटानेच जनावरे चारावीत असे सांगण्यात आले.अलीकडच्या काळात कुही तालुक्यात वाघांच्या हालचाली व हल्ले वाढल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे भोरदेवसह तालुक्यातील शेतकरी आणि गुराखी यांच्यात भीतीचे वातावरण आहे.