कामठी खैरी जलाशयाच्या कालव्यात आईसह पाच वर्षांचा मुलगा बुडाला
शोधकार्य सुरू
नागपूर : जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील खैरी जलाशयाच्या कालव्यात मंगळवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. अलका शेखर बेहुणे (वय अंदाजे ३०) या महिलेसह तिचा पाच वर्षीय मुलगा अचानक पाण्यात बुडाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक मासेमारांच्या मदतीने दोघांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. अद्याप दोघांचा थांगपत्ता लागलेला नाही. ती महिला मुलासह कालव्यावर कशासाठी गेली होती, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी शोधकार्य अधिक तीव्र केले असून, जलाशय परिसरात शोध घेतला जात आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.


