मुलीला परीक्षेसाठी सोडायला आलेल्या बापावर काळाचा घाला ; कंटेनरखाली चिरडून हृदयद्रावक मृत्यू
नागपूर : मुलीच्या आयटीआयच्या परीक्षेसाठी सोबत आलेल्या पित्याचा अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. भीसम दीनूराम शाहू, रा. गोपालनगर, कलमना, नागपूर असे 50 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका भीसम शाहू ही शासकीय तांत्रिक संस्थान, बर्डी येथे शिक्षण घेत आहे. तिची परीक्षा मेघसाई प्रायव्हेट आयटीआय, डोंगरगाव येथे होती. मंगळवारी सकाळी वडील भीसम शाहू तिला परीक्षेला सोडण्यासाठी मोटारसायकलने डोंगरगाव येथे घेऊन आले. सकाळी दहा वाजता मुलीला परीक्षा हॉलवर सोडल्यानंतर ते रस्ता पार करण्यासाठी निघाले. याच वेळी भारती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मालकीचा अशोक लेलँड कंटेनर क्रमांक MH 40 CM 9800 वेगाने त्या रस्त्यावरुन येत होता. कंटेनर चालकाने शाहूंना जोरदार धडक दिली. यानंतर कंटेनरचं पुढील चाक त्यांच्या पायांवरुन गेलं. रस्त्याच्या दुभाजकावर आदळून ते गंभीर जखमी झाले. त्यांचा डोक्याला आणि पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

परिसरातील नागरिकांनी तातडीने हिंगणा पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिस पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेत वाहन जप्त केले. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणात हिंगणा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.


